ग्रामपंचायत निवडणूक :गडहिंग्लज तालुक्यातील ५० गावात रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 05:26 PM2020-12-16T17:26:59+5:302020-12-16T17:31:09+5:30
gram panchayat, kolhapur, Election गडहिंग्लज तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ५० ग्रामपंचायती निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच गावात सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच अपेक्षित आहे. नेत्यांच्या गावांसह मोठ्या १० गावातील लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
राम मगदूम
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ५० ग्रामपंचायती निवडणूक १५ जानेवारीला होत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच गावात सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच अपेक्षित आहे. नेत्यांच्या गावांसह मोठ्या १० गावातील लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
वर्षापूर्वी झालेली विधानसभा निवडणूक आणि आगामी जि. प. व पं. स., गडहिंग्लज बाजार समिती व साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सत्ता संघर्ष रंगणार आहे.
स्थानिक पातळीवर सोयीच्या आघाड्यामध्येच सत्तासंघर्ष अपेक्षित आहे. परंतु, राज्यातील बदलती परिस्थिती लक्षता घेता भाजपा विरूद्ध महाविकास आघाडी असेच चित्र या निवडणुकीतही पहायला मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांनी संबंधित सर्व गावांचा दौरा करून कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. तद्वत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांचे कडगाव-कौलगे मतदारसंघातील गावांच्या निवडणुकीवर विशेष लक्ष आहे. परंतु, भाजपासह अन्य पक्षांच्या छावणीत अजूनही सामसूमच आहे.
निवडणूक होणारी गावे
ऐनापूर, अरळगुंडी, औरनाळ, बेळगुंदी, बुगडीकट्टी, चन्नेकुप्पी, चिंचेवाडी, दुगूनवाडी, दुंडगे, गिजवणे, हलकर्णी, हुनगिनहाळ, हेब्बाळ - जलद्याळ, हेब्बाळ कसबानूल, हिरलगे, हनिमनाळ, इदरगुच्ची, इंचनाळ, जांभूळवाडी, जरळी, कानडेवाडी, खणदाळ, लिंगनूर तर्फ नेसरी, लिंगनूर कसबा नूल, माद्याळ कसबा नूल, मनवाड, मांगनूर तर्फ सावतवाडी, मासेवाडी, मुंगूरवाडी, मुत्नाळ, नंदनवाड, नरेवाडी, नौकुड, निलजी, नूल, शेंद्री, शिंदेवाडी, शिप्पूर तर्फ आजरा, सावतवाडी तर्फ नेसरी, तळेवाडी, तेगिनहाळ, तेरणी, तुप्पूरवाडी, उंबरवाडी, वडरगे, वाघराळी, हसूरचंपू, हरळी बुद्रूक, बसर्गे, चंदनकूड
- निवडणूक होणारी एकूण गावे - ५०
- चंदगड मतदारसंघातील गावे - ४२
- कागल मतदारसंघातील गावे - ०८
डोकेदुखी थांबली..!
सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतरच जाहीर होणार आहे. त्यामुळे पॅनेल रचना करताना होणारी स्थानिक नेत्यांची डोकेदुखी थांबली आहे. यावेळी सदस्यांमधूनच सरपंच निवड होणार असल्याने बहुमतासाठी गावा-गावात मोठी चुरस पहायला मिळणार आहे.
लक्षवेधी गावे
नूल, गिजवणे, हलकर्णी, बसर्गे, ऐनापूर, इंचनाळ, हेब्बाळ काानूल, तेरणी, दुंडगे, कानडेवाडी