राणे-रावल भेटीने चर्चांना उधाण

By admin | Published: April 2, 2017 11:26 PM2017-04-02T23:26:39+5:302017-04-02T23:26:39+5:30

राणे-रावल भेटीने चर्चांना उधाण

Rane-Rawal visits spell out gifts | राणे-रावल भेटीने चर्चांना उधाण

राणे-रावल भेटीने चर्चांना उधाण

Next


कणकवली : पर्यटन व रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांची रविवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास भेट घेतली. कणकवलीतील राणे यांच्या ‘ओम गणेश’ या निवासस्थानी दाखल होत पक्षीय भेद बाजूला ठेवत मंत्री रावल यांनी राणेंशी कोकण पर्यटन विकासावर पाऊण तास चर्चा केल्याचे समजते. मात्र, राणे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सर्वत्र रंगली असताना मंत्री रावल व राणेंच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पर्यटनमंत्री जयकुमार रावल तीन दिवसांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. रविवारी सकाळी कणकवलीत दाखल झालेल्या पर्यटनमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी नारायण राणे यांनी तोंडवळी येथील बहुप्रतिक्षित सी-वर्ल्ड प्रकल्पासहीत संपूर्ण कोकण किनारपट्टी विकसित करण्याबाबत मंत्री रावल यांना काही सूचना केल्या. तसेच सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा घोषित झाल्यानंतर टाटा कन्सल्टन्सीने केलेल्या सर्व्हेचा संदर्भ येथे पर्यटन विकास योजना बनविताना घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सुचविले.
या दरम्यान, राणेंसोबत मंत्री रावल यांनी चहापानही केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, भाजप कणकवली तालुकाध्यक्ष रवींद्र शेट्ये, डामरे सरपंच बबलू सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी प्रसिद्धीमाध्यमांना बैठकस्थळी प्रवेश नसल्याने त्यांच्या चर्चेबाबत अधिक माहिती समजू शकली नाही. मात्र, पर्यटनमंत्री जयकुमार रावल व नारायण राणे यांच्या भेटीबाबत सिंधुदुर्गातील जनतेतून अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. तसेच रविवारी दिवसभर याबाबत चर्चा रंगली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Rane-Rawal visits spell out gifts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.