राणे, आवाडेंना नको कोण म्हणणार?
By admin | Published: March 27, 2017 01:09 AM2017-03-27T01:09:17+5:302017-03-27T01:09:17+5:30
चंद्रकांतदादा पाटील यांची ‘गुगली’: राज्य सरकार स्थिर असल्याचा दावा
कोल्हापूर : उत्तर प्रदेशातील भाजपच्या विजयानंतर जर ओमर अब्दुल्ला २०१९ ऐवजी २०२४ च्या लोकसभेची तयारी करायला हवी, असे म्हणत असतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे नारायण राणे, प्रकाश आवाडे यांच्यासारखे नेते जर भाजपमध्ये येत असतील तर त्यांना नको कोण म्हणेल; असा प्रतिप्रश्नच महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
प्रेस क्लबच्या कार्यालय उद्घाटनानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, या दोघांच्या प्रवेशाबद्दल मला माहीत नाही; परंतु त्या-त्या भागांतील नेते, कार्यकर्त्यांशी बोलून असे निर्णय घेतले जातात. ते काम प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे करतील. राणे हे शिवसेनेत जातील, भाजपमध्ये जातील आणि काँग्रेसमधून बाहेर पडणारच नाहीत, असे त्यांच्याबद्दल बोलले जाते. हवी-हवीशी वाटणारी अशी माणसे फार कमी असतात, असेही मत त्यांनी व्यक्त केले. अनेक नेते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. राणे यांचेही नाव तसेच चर्चेत आले आहे.
मात्र, शिवसेनेच्या विरोधात जाणीवपूर्वक काही मोहीम चालविली आहे अशातला हा भाग नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात मध्यावधी निवडणुकांची चर्चा आहे.
याबाबत विचारल्यानंतर ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली; कशासाठी ही चर्चा. २८८ पैकी जवळपास २०० आमदार आमचे आणि शिवसेनेचे असल्यानंतर ही चर्चा निरर्थक आहे. वादाचे अनेक विषय असतात. त्यावरून मतभेद होतात. मंत्रिपदे, त्यांचा दर्जा, त्यांची जबाबदारी असे अनेक विषय असतात. घरात पती-पत्नीचेही नेहमी भांडण होत असते तसेच हे विषय आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या चर्चेमध्ये काही अर्थ नाही, असेही ते म्हणाले.
‘मातोश्री’वर जाणार नाही
चंद्रकांतदादा म्हणाले, मी आणि सुधीर मुनगंटीवार ‘मातोश्री’वर जाणार असल्याची चर्चा आहे; पण आता तसे काही कारण नाही. मात्र, उत्तर प्रदेशच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना अभिनंदनाचा फोन केला होता तेव्हा पंतप्रधानांनी त्यांना सपत्निक भोजनाचे निमंत्रण दिले आहे, असे पाटील यांनी सांगितले.