राणेंनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी : जठार
By admin | Published: July 23, 2014 09:40 PM2014-07-23T21:40:03+5:302014-07-23T21:56:47+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्याची काळजी आम्ही समर्थपणे घेऊ
जामसंडे : नारायण राणे यांनी राजीनामा देण्याऐवजी राजकारणातून सन्मानपूर्वक निवृत्ती घ्यावी, असा टोला आमदार प्रमोद जठार यांनी जामसंडेमधील पत्रकार परिषदेत दिला. त्यांनी आपल्या प्रकृतीला त्रास करून घेऊ नये. सिंधुदुर्ग जिल्ह्याची काळजी आम्ही समर्थपणे घेऊ, असेही प्रमोद जठार यांनी सांगितले.
जठार म्हणाले, नारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी उद्योगपतींमार्फत मध्यस्थी केली. भरपूर प्रयत्नही केले. मात्र भाजपाचे राज्यातील, कोकणातील नेते व शिवसेनेच्या जाहीर विरोधामुळे त्यांचा भाजपात प्रवेश होऊ शकला नाही. आमच्यादृष्टीने नारायण राणेंचा विषय इतिहासजमा झाला असून आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वर्तमान व भविष्याचा विचार करण्याची गरज आहे. तसेच यावेळी जठार यांनी देवगड किल्ला येथील पर्यटन प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यटन खात्याकडून प्रशासकीय मंजुरी मिळाल्याचे सांगितले. यासाठी केंद्राकडून ५ कोटी तर राज्याकडून २.५० कोटींचा निधी मिळणार आहे. एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांकडून या जागेची पाहणी करण्यात येणार आहे, असेही प्रमोद जठार यावेळी म्हणाले.
आॅगस्ट महिन्यात हेलियम डे वेळी विजयदुर्ग येथे गोव्याचे पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. या दिवशी कणकवलीमध्ये पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.
देवगडमधील आंबेरी पूल ते वेंगुर्लामधील आरोंदापर्यंतच्या सागरी महामार्गास पर्यटन महामार्गाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार आहोत, असेही प्रमोद जठार यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम उपस्थित होते. (वार्ताहर)