सोशल मीडियावर रंगला फ्रेंडशिप डे, कोरोनामुळे मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:14 PM2020-08-03T17:14:47+5:302020-08-03T17:18:14+5:30

मैत्री असावी सुदामा आणि श्रीकृष्णसारखी,  काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलांची रास म्हणजे मैत्री, अशा विविध संदेशांनी रविवारी यंदा फ्रेंडशिप डे (मैत्री दिन) रंगला.

Rangala Friendship Day on social media, limits due to corona | सोशल मीडियावर रंगला फ्रेंडशिप डे, कोरोनामुळे मर्यादा

सोशल मीडियावर रंगला फ्रेंडशिप डे, कोरोनामुळे मर्यादा

googlenewsNext
ठळक मुद्देसोशल मीडियावर रंगला फ्रेंडशिप डे, कोरोनामुळे मर्यादा युवा सेना, नो मर्सी ग्रुप, संकल्प फौंडेशन, रॉबिनहूड आर्मीकडून सामाजिक किनार

कोल्हापूर : मैत्री असावी सुदामा आणि श्रीकृष्णसारखी,  काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलांची रास म्हणजे मैत्री, अशा विविध संदेशांनी रविवारी यंदा फ्रेंडशिप डे (मैत्री दिन) रंगला.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोल्हापुरात अनेकांनी प्रत्यक्ष भेटीगाठींना बगल देऊन व्हर्च्युअली एकमेकांना शुभेच्छा दिल्या. युवा सेना, नो मर्सी ग्रुप, संकल्प फौंडेशन, रॉबिनहूड आर्मीच्या विविध उपक्रमांनी या फ्रेंडशिप डेला सामाजिक किनार लाभली.

तरुणाईकडून दरवर्षी ऑगस्टमधील पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या दिवशी सुटी असल्याने मोठ्या उत्साहात युवावर्ग जल्लोष करतो. मात्र, या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे आणि ते वाढत असल्याने रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करताना तरुणाईला मर्यादा आल्या.

प्रत्यक्षात भेटता येत नसल्याने युवक-युवतींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना मैत्रीपर विविध संदेश, गेल्या वर्षीच्या जल्लोषाची छायाचित्रे एकमेकांना शेअर करून शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, मैत्रीदिनानिमित्त युवा सेना कोल्हापूर आणि नो मर्सी ग्रुपच्या वतीने तीन हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे (दप्तर, वह्या, कंपास, आदी) वाटप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवसेना शहर कार्यालयात हा कार्यक्रम झाला. सामाजिक भावनेतून मैत्री युवा महोत्सवाचा खर्च टाळून त्या रकमेतून शहरातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून पालकांना दिलासा देण्याचा कौतुकास्पद उपक्रम युवा सेना, नो मर्सी ग्रुपच्या वतीने करण्यात असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

यावेळी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमोद कोळी यांनी ३०० डझन वह्या देऊन या उपक्रमास मदत केली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर, ज्ञानदीप क्लासचे संचालक नारायण निळपणकर, नो मर्सी ग्रुपचे अक्षय पाटील, अजिंक्य पाटील, रोहन घोरपडे, हर्षवर्धन पाटील, युवा सेनेचे सौरभ कुलकर्णी, कृपालसिंह रजपूत, विजय रेळेकर उपस्थित होते.

मंगळवार पेठेतील संकल्प फौंडेशनच्या वतीने झाडांना मैत्रीचा धागा बांधून झाडांचे महत्त्व सांगणारा निसर्गपूरक मैत्री दिन साजरा करण्यात आला. फौंडेशनचे अक्षय शेळके, सुशांत चव्हाण, अमित रणदिवे, संकेत जोशी, निखिल जाधव, अभिजित चव्हाण, सतेज पोलादे, धनंजय चव्हाण, आदींनी हा उपक्रम राबविला.

रॉबिनहूड आर्मीच्या वतीने शनिवारी आणि रविवारी शहरातील शंभराहून अधिक स्वच्छतादूतांचा सत्कार करण्यात आला. त्यांना लहान मुलांनी बनवलेले आभारपत्र, फेसमास्क, ग्लोव्हज, आदींचे वाटप करण्यात आले.

यावेळी राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य अण्णासाहेब खेमनार, हिंदुस्थान बेकरीचे मालक वहाब शेख, डॉ. बाबासाहेब भोसले, प्रवीण कोडोलीकर, ऐश्वर्या मुनीश्वर, वर्षा टिक्के, नूपुर रावळ, प्रसाद सोनुले, आदी उपस्थित होते.

कॉलनी, गल्लीतच भेटीगाठी

कोरोनामुळे सामूहिकरीत्या कार्यक्रमास बंदी असल्याने यंदा जाहीर कार्यक्रम झाले नाहीत. कॉलनी, गल्ली, अपार्टमेंटमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपापल्या मित्र, मैत्रिणींच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांनी सोशल डिस्टन्सिंग राखत एकमेकांना फ्रेंडशिप बँड बांधून आनंद व्यक्त केला.

Web Title: Rangala Friendship Day on social media, limits due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.