इस्लामपूर नगरपालिकेत रंगलंय राजीनामा नाट्य
By admin | Published: May 10, 2017 10:27 PM2017-05-10T22:27:15+5:302017-05-10T22:27:15+5:30
शहरात चर्चा : नगराध्यक्षांपाठोपाठ आता उपनगराध्यक्षांची खेळी, सोशल मीडियावरील झळकले पत्र
अशोक पाटील । --लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट करून काही तास जातात, तोपर्यंत उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीला दिलेला पाठिंबा काढल्याबाबतच्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. परंतु या पत्रावर पाटील यांची स्वाक्षरी नाही. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. पालिकेतील राजीनामानाट्याची चर्चा शहरभर सुरू आहे.
विकास आघाडीचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील तीन दिवस पालिकेच्या कामकाजात सक्रिय नसल्याने त्यांच्या भूमिकेविषयी पालिका वर्तुळातून शंका व्यक्त होत होती. त्यांच्या काही विरोधकांनी तर पाटील यांनी राजीनामा दिल्याची अफवा पसरवली. त्यानंतर मंगळवारी खुद्द नगराध्यक्ष पाटील यांनी आपल्या दालनात कामकाजाला सुरुवात केल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला.
या घडामोंडींना काही तासांचा अवधी जातो ना जातो तोच उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांची स्वाक्षरी नसलेले राष्ट्रवादीला दिलेला पाठिंबा काढून घेतल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे पत्र राष्ट्रवादीला देण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, ‘आपणास कळविण्यात येते की, मी आमदार जयंत पाटील यांच्या आग्रहाखातर राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. आपल्या पक्षातर्फे मला उपनगराध्यक्षपद भूषविण्याचा सन्मान दिला. मी आपल्याला कोणत्याही प्रकारे दोष देत नाही. तथापि बऱ्याच गोष्टींनी माझे मन वारंवार दुखावले जात आहे. त्याचा मला मानसिक व शारीरिक त्रास होत आहे. आपण दिलेल्या ऋणाला मी योग्यप्रकारे न्याय देऊ शकत नसल्याचे वारंवार प्रत्ययास येत आहे. त्यामुळे मला या ऋणातून मुक्त करावे, ही विनंती. येथून पुढे मी सभागृहामध्ये आपल्या पक्षाच्या बाजूने असेन.’
राजीनामानाट्याची हवा तापली झाली आहे. आता दादासाहेब पाटील यांची भूमिका काय राहणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पत्रामागचे नेमके इंगीत काय..?
सोशल मीडियावरील पत्रामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत दादासाहेब पाटील यांच्याशी अनेकवेळा संपर्क साधण्याचा तसेच त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांच्याकडून या पत्राबाबत खुलासा न झाल्याने यामागचे इंगीत काय, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद संजय कोरे यांनी याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले.