दमदार पाऊस; कोल्हापूर जिल्ह्यातील 'ही' ठिकाणे पर्यटनासाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 07:36 PM2023-07-19T19:36:31+5:302023-07-19T19:38:05+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परिणामी धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु ...
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परिणामी धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. यामुळे जिल्ह्यातील ४९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळेपर्यटनासाठी बंद केली आहेत.
भुदरगड तालुक्यात पावसामुळे रांगणा किल्ला, शिवडाव बुद्रुक येथील नाईकवाडी धबधबा व दोनवडे येथील सवतकडा धबधबा तसेच तोरस्करवाडी धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना व स्थानिकांना बंदी करण्यात आली असल्याची माहिती भुदरगड तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसिलदार अश्विनी वरुटे-अडसूळ यांनी दिली आहे.
रांगणा किल्ल्यावर दिनांक १८ जुलै २०२३ रोजी पर्यटनासाठी गेलेले १७ पर्यटक अडकले होते. त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. या घटनेची पुननावृत्ती होऊ नये किंवा एखादी दुर्घटना होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळा संपेपर्यंत रांगणा किल्ल्याकडे तसेच शिवडाव बुद्रुक येथील नायकवाडी धबधबा व दोनवडे येथील सवतकडा धबधबा व नितवडे येथील तोरस्करवाडी धबधबा इत्यादी ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांकडे पर्यटनासाठी जाऊ नये, असे आवाहन तहसिलदार अडसूळ यांनी केले आहे.