सलग सुटीमुळे ‘अंबाबाई’च्या दर्शनासाठी रांगाच रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 03:54 PM2019-05-27T15:54:47+5:302019-05-27T15:58:13+5:30
शनिवार व रविवार अशा सलग सुट्ट्या व त्यात मुलांना पडलेल्या उन्हाळी सुटीमुळे करवीरनिवासिनी अंबाबाई दर्शनासाठी रविवारी दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती. विशेषत: पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
कोल्हापूर : शनिवार व रविवार अशा सलग सुट्ट्या व त्यात मुलांना पडलेल्या उन्हाळी सुटीमुळे करवीरनिवासिनी अंबाबाई दर्शनासाठी रविवारी दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती. विशेषत: पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
उन्हाळ्याची सुटी आणि त्यात सलग दोन दिवस मिळालेल्या सुटीमुळे राज्यासह परराज्यांतून पर्यटक भाविक कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. त्यामुळे शनिवार व रविवार अक्षरश: अंबाबाई मंदिराचा परिसर फुलून गेला होता. परिसरातील हॉटेल्स, यात्री निवास, धर्मशाळांवर ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड लागले होते. अंबाबाईच्या दर्शनानंतर भाविकांनी जवळील ठिकाण म्हणून प्रथम टाऊन हॉल बागेतील संग्रहालय आणि न्यू पॅलेस व त्यानंतर ‘दख्खनचा राजा’ जोतिबा-पन्हाळा दर्शन असा बेत आखला होता. त्यामुळे दिवसभर या परिसरात गर्दीच गर्दी दिसून येत होती.
भाविकांचे जथ्येच्या जथ्ये महाद्वार रोड, जोतिबा रोड, ताराबाई रोड, पापाची तिकटी, चप्पल लेन, छत्रपती शिवाजी चौक येथे दिसत होते. परराज्यांहून आलेल्या भाविकांनी दर्शनानंतर कोल्हापुरी जेवणावर ताव मारला. त्यामुळे दुपारी शहरातील हॉटेल्समध्येही गर्दी दिसत होती.
गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भाविक कोल्हापुरात दाखल झाल्याने वाहतूक व्यवस्थेवरही मोठा ताण आला होता. त्यात बिंदू चौक, शिवाजी चौक, स्टेशन रोड, कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गासह ताराराणी चौक आदी ठिकाणी वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणात होती. शहर वाहतूक शाखेनेही विशेष पोलीस फौजफाटा या वाहतूक नियंत्रणासाठी शहराच्या गजबजलेल्या चौकात तैनात केला होता. त्यामुळे वाहतूक विना अडथळा सुरू होती.