कोल्हापुरात रंगली रंगसुरांची मैफिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:14 PM2019-01-20T23:14:51+5:302019-01-20T23:14:55+5:30

कोल्हापूर : निसर्गरम्य अशा संस्थानकालीन टाऊन हॉल म्युझियम बागेत ‘रंगबहार’तर्फे रविवारी सकाळी आयोजित केलेल्या रंगसुरांची मैफिल संगीत अन् रंगांच्या ...

Ranghasur's concert in Kolhapur | कोल्हापुरात रंगली रंगसुरांची मैफिल

कोल्हापुरात रंगली रंगसुरांची मैफिल

Next

कोल्हापूर : निसर्गरम्य अशा संस्थानकालीन टाऊन हॉल म्युझियम बागेत ‘रंगबहार’तर्फे रविवारी सकाळी आयोजित केलेल्या रंगसुरांची मैफिल संगीत अन् रंगांच्या उधळणीत बहरली. चित्र, शिल्प, रांगोळी अशा विविध कलांची उधळण करीत कलाकारांनी दर्दी रसिकांना वेगळी अनुभूती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर व विश्वरंग विश्वनाथ नागेशकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते विश्रांत पोवार यांना जीवन गौरव, तर श्यामकांत जाधव कला प्रतिष्ठानतर्फे दिला जाणार युवा चंद्राश्री हा पुरस्कार किशोर पुरेकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अजेय दळवी, ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव, वास्तुविशारद इंद्रजित नागेशकर, विलास बकरे, सर्जेराव निगवेकर, रियाज शेख, विजय टिपुगडे, सागर बगाडे, राहुल रेपे, संजीव संकपाळ, आदी उपस्थित होते.
या मैफिलीत चित्रकार अशोक धर्माधिकारी, पुष्पक पांढरबळे, महेश सुतार (गडहिंग्लज), रमन लोहार (गडहिंग्लज), प्रा. विश्वास पाटील (इचलकरंजी) यांनी व्यक्तिचित्र रेखाटले, तर विवेक कवाळे यांनी सेल्फ पोर्टेट रंगविले. अमित मुसळे यांनी अचूक रेखांकनातून अर्कचित्र साकारले. मनोहारी निसर्गाला रंगरेषातून एस. निंबाळकर, मनोज दरेकर, अक्षय पाटील, अशोक बी. साळुंखे (पुणे) यांनी चित्र साकारले, तर कलाकारांच्या मनोभावना व्यक्त करणाऱ्या कलाकृती चेतन चौगले, सरिता फडके (गडहिंग्लज), आनंदा सावंत (कोल्हापूर), विजय उपाध्ये (कोल्हापूर), राखी अराडकर (सिंधुदुर्ग), विनायक पोतदार (पुणे) यांनी साकारल्या. युवा शिल्पकार आशिष कुंभार, प्रशांत दिवटे, प्रफुल्ल कुंभार, योगेश माजगावकर, प्रफुल्ल कुंभार यांनी व्यक्तिशिल्प साकारले. रंगावलीकर प्रसाद राऊत यांनी रंगावलीतून मैफिलीला सलाम केला.
रंगमैफिलीला सुरांची साथ
ग्वाल्हेर घराण्यातील युवा गायिका स्वानंदी निस्सीम (मुंबई) यांच्या शास्त्रीय गायनाने मैफिलीला सुरुवात झाली. त्यांना तबला साथ प्रशांत देसाई, तर हार्मोनियम साथ सारंग कुलकर्णी यांनी दिली.
असाही सलाम
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, रंगसुरांची मैफिल म्हणजे स्प्रिंग बोर्ड आहे. येथे संधी मिळालेला कलाकार नंतर अखिल विश्वात नावलौकिक मिळवितो. ते म्हणाले प्रत्येक माणूस जन्मजातच चित्रकार असतो. पण चित्रकार म्हणून कार्यरत राहणे, कलाकारांना एकत्र करणे आणि हा उपक्रम गेली ४१ वर्षे अखंडपणे चालविणे हे विशेष आहे. अशा ध्यास घेतलेल्या माणसाबद्दल अर्थात ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव यांनी चालविलेल्या चळवळीला माझा सलाम, असे उद्गार ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी काढले.
पुरस्काराची रक्कम ‘रंगबहार’ संस्थेला
ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव कला प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा चंद्राश्री हा पुरस्कार किशोर पुरेकर यांना प्रदान करण्यात आला. यात रोख रक्कम, मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यातील रक्कम तत्काळ पुरेकर यांनी रंगबहार संस्थेच्या कार्यासाठी अजेय दळवी यांच्याकडे सुपूर्द केली.

Web Title: Ranghasur's concert in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.