रांगणा किल्ला प्रसिद्धीपासून वंचितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:19 AM2019-05-14T00:19:18+5:302019-05-14T00:19:23+5:30
शिवाजी सावंत । लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी : इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकोटांनी ऐतिहासिक घटना जिवंत ठेवल्या आहेत. महाराष्ट्रात कोल्हापूर ...
शिवाजी सावंत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गारगोटी : इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकोटांनी ऐतिहासिक घटना जिवंत ठेवल्या आहेत. महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा ठेवा लाभलेला जिल्हा आहे. किल्ला हा मराठी माणसांच्या रक्तात भिनला आहे. काही किल्ले प्रसिद्ध तर काही प्रसिद्धीपासून वंचित आहेत.
भुदरगड तालुक्यातील 'रांगणा' किल्ला असाच एक इतिहासकालीन किल्ला प्रसिद्धीपासून वंचित आहे. निसर्गाच्या अद्भूत लीला पाहाव्यात तर रांगणा परिसराला भेट देणे गरजेचे आहे.
गर्द हिरवी वनराई, असंख्य दुर्मीळ वन्यजीव, पशु-पक्षी, दुर्मीळातील दुर्मीळ अशा वनौषधी वनस्पती या परिसरात मुबलक प्रमाणात आढळतात. डोंगर-दऱ्यांनी आणि जंगलाने वेढलेला रांगणा गड हा घाटमाथा आणि कोकणाच्या नैसर्गिक सीमारेषेवर वसलेला आहे.
‘गडकोटांचा राजा’ अशी बिरुदावली ज्या राजाला लावली जाते त्या राजा भोज (द्वितीय) यांनी अनेक गड उभारलेत. त्यातीलच एक रांगणा किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून दोन हजार दोनशे सव्वीस फूट उंचीची हा गड आज इतिहासात डोकावून पाहता रायगडनंतर मराठा दौलतीच्या राज्य कारभाराची १९ महिने धुरा वाहणाºया रांगणा किल्ल्याला 'मराठ्यांची दुसरी राजधानी' म्हणून इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळाले. त्याकाळी रहदारीचे आणि वेगवान लष्करी, राजकीय घडामोडीचे केंद्र होता. रांगण्यावरुन कोकण आणि घाटमाथ्यावर लक्ष ठेवता येत होते
औरंगजेबाविरुद्धच्या लढाईत रायगड पडला त्यावेळी छ. राजाराम महाराजांनी रांगणा जवळ केला. याठिकाणी त्यांनी दीड वर्षे वास्तव केले.
शिलाहारवंशीय 'महामंडलेश्वर राजा भोज दुसरा' याने इ.स.११८७ मध्ये राज्याच्या सुरक्षिततेसाठी बांधलेल्या पंधरा किल्ल्यांपैकी एक म्हणजे रांगणा किल्ला. आठशे वर्षांच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून आजही खंबीरपणे उभा आहे. खुद्द छत्रपतींनी 'प्रसिद्धगड' असे नाव देऊनही 'रांगणा' म्हणूनच प्रसिद्ध असलेल्या या किल्ल्याचा उल्लेख चिटणीसांच्या बखरीत 'बेलाग आणि मजबूतगड' असा येतो.
रांगण्याच्या पडक्या अवस्थेतील खुणा होऊन राहिलेल्या दारुगोळ्याची कोठारे, घोड्यांचे तबेले, पागा दिसतात. गडावर पूर्वी सात दरवाजे होते, असे सांगतात पण त्यातील बरेचशे दरवाजे सध्या नष्ट झाले आहेत. गडावरील इतिहास प्रसिद्ध 'हत्ती बुरुज' कोसळला आहे. तोफही तट कोसळल्याने खोल दरीत पडल्या आहेत. कोकणचे विहंगम दृश्य पाहावयास मिळते. सूर्योदय व सूर्यास्त पाहणे हे एक विलक्षण आल्हाददायक आहे.