महाद्वार चौकातील रांगोळी, आवळे विक्रेत्यांचा ‘आक्रोश’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:22 AM2021-02-13T04:22:53+5:302021-02-13T04:22:53+5:30
कोल्हापूर : महाद्वार चौक फेरीवाला मुक्त करण्याबाबत तोडगा निघाला असताना दुसऱ्याच दिवशी (शुक्रवारी) येथील २५ मीटर परिसर रिकामा करण्यासाठी ...
कोल्हापूर : महाद्वार चौक फेरीवाला मुक्त करण्याबाबत तोडगा निघाला असताना दुसऱ्याच दिवशी (शुक्रवारी) येथील २५ मीटर परिसर रिकामा करण्यासाठी आलेल्या महापालिका कर्मचारी आणि परिसरातील रांगोळी, आवळे विक्रेते यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी पोलीस प्रशासनाच्या बळावर साहित्य जप्त करत असताना वाद आणखीन चिघळला. विक्रेत्यांना अश्रू अनावर झाले. कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी अखेर विक्रेत्यांची समजूत काढली. याच ठिकाणी जागा देण्यासाठी सोमवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासोबत बैठक घेऊ, अशी ग्वाही दिल्यानंतर विक्रेत्यांनी व्यवसाय बंद करून साहित्य बाजूला करून घेतल्यानंतर वादावर पडदा पडला. महाद्वार चौक रिकामा झाला.
अंबाबाई मंदिरातील महाद्वार चौकाच्या तिन्ही बाजूचा २५ मीटर परिसर फेरीवालामुक्त करण्यावर फेरीवाला कृती समिती आणि महापालिका प्रशासन यांचे गुरुवारी रात्री एकमत झाले होते. फेरीवाले आणि महापालिका यांच्यातील वादावर पडला असे वाटतच असताना शुक्रवारी मात्र, महाद्वार चौकातील २५ मीटर परिसर रिकामा करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथक आणि आवळा, आंबा, रांगोळी विक्रेत्यांमध्ये वादावादी सुरू झाली.
अतिक्रमण निर्मुलन पथक प्रमुख पंडित पवार म्हणाले, फेरीवाला कृती समितीने २५ मीटर परिसरात कोणीही फेरीवाले राहणार नसल्याचे मान्य केले असून तुम्हाला येथे व्यवसाय करता येणार नाही, अन्यथा साहित्य जप्त केले जाईल. त्यावर विक्रेत्यांनी कृती समितीनेच याच ठिकाणी रस्त्याच्या आत व्यवसाय करण्याची सूचना केली असून येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. यावर पंडित पवार यांनी कृती समितीच्या नेत्यांनी तुम्हाला ‘शब्द’ दिला असून आम्हाला त्यांनी सांगितलेले नाही. नेत्याने ठरवले ते करा, नेते एक आणि तुम्ही एक, अशी दुटप्पी भूमिका घेऊ नका, असे ठणकावून सांगितले. यावेळी काही विक्रेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. गेल्या ४० वर्षांपासून येथे व्यवसाय करतो. कारवाई करणारच असाल तर सर्वांवरच करा, अशी मागणी केली. यावेळी विक्रेते आणि पंडित पवार, इस्टेट अधिकारी सचिन जाधव यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. कृती समितीचे दिलीप पवार, प्र. द. गणपुले, सुरेश जरग, समीर नदाफ, आशा वोरा यांनी मध्य मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार आल्यानंतर विक्रेत्यांची समजूत काढल्यानंतर वादावर पडदा पडला.
चौकट
महाद्वार चौक येथील २५ मीटर परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे. कृती समितीनेही ते मान्य केले आहे. १० लोकांसाठी १०० लोकांवर अन्याय होत कामा नये. महाद्वार चौकातील १५ आवळे, रांगोळी विक्रेत्यांचा प्रश्न आहे. त्यांना आहे तेथेच जागा देऊ, सध्या साहित्य बाजूला करून महाद्वार चौक रिकामा करून द्यावा, अशी सूचना आर. के. पोवार यांनी विक्रेत्यांना केल्या. सोमवारी प्रशासक डॉ. बलकवडे, कृती समिती, आमदार चंद्रकांत जाधव यांची बैठक आहे. येथील विक्रेते रांगोळी, आवळा, आंबा अशा सुट्ट्या मालाची विक्री करत असून त्यांच्यापासून वाहतुकीला आणि संबंधित दुकानदारांना त्रास होत नसल्याचे प्रशासकांना पटवून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चौकट
विक्रेत्यांच्या अश्रू अनावर
कर्ज काढून माल खरेदी केला असून चार दिवसांमध्ये कारवाईमुळे खराब झाला असल्याचे सांगत येथील आवळा विक्रेत्या शीला नाईक यांना अश्रू अनावर आले. त्या म्हणाल्या, आतापर्यंत अतिक्रमणाच्या नावाखाली पाचवेळा जागा बदलली आहे. दरवेळीच आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही व्यवसायच बंद करतो, महापालिकेने आमच्या मुलांना नोकरी द्यावी.
चौकट
महापालिकेला कारवाईसाठी ‘सुपारी’
हातावरचे पोट असणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. महापालिकेला कारवाईसाठी सुपारी दिली असल्याचा आरोप विक्रेत्या शारदा गवंडी यांनी केला. कारवाई केली तर वेगळं वळण लागेल, असा इशाराही दिला. आमचे वाईट करणाऱ्यांचे चांगले होणार नाही, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. काही विक्रेत्यांनी खालच्या पातळीवर जात अधिकाऱ्यांचा समाचार घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झाले.
चौकट
आर. के. पोवार दुकानदारांवर भडकले
कृती समितीने गुरुवारी रात्री महाद्वार चौकातील काही दुकानदारांना भेटून आवळे, रांगोळी विक्रेते बसल्यास अडचण येईल का, अशी विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी कोणतीच तक्रार केली नाही. शुक्रवारी महापालिकेने कारवाई केल्यानंतर पुन्हा आर. के. पोवार महाद्वार चौकासमोरील एका दुकानदाराकडे गेले. त्यांनी महापालिका आणि फेरीवाल्यांचा विषय असून आम्हाला यामध्ये घेऊ नका, असे म्हटले. यावर आर. के. पोवार त्यांच्यावर चांगलेच भडकले.
फोटो : १२०२२०२१ कोल केएमसी अतिक्रमण कारवाई१
फोटो : १२०२२०२१ कोल केएमसी अतिक्रमण कारवाई२
फोटो : १२०२२०२१ कोल केएमसी अतिक्रमण कारवाई४
ओळी : कोल्हापूर महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन पथक शुक्रवारी पोलीस फौजफाट्यासह महाद्वार चौकातील अतिक्रमण हटविण्यासाठी आल्यावर आवळे, रांगोळी विक्रेत्यांनी त्यांना विरोध केला. यावेळी विक्रेते, फेरीवाला कृती समिती सदस्य आणि महापालिका अधिकारी यांच्यात जोरदार वादावादी झाली.
फोटो : १२०२२०२१ कोल केएमसी अतिक्रमण कारवाई३
ओळी : कोल्हापुरातील महाद्वार चौकातील आवळे, रांगोळी विक्रेते गेल्या ४० वर्षांपासून येथे व्यवसाय करत असून महापालिका कारवाई करत असल्यामुळे त्यांना अश्रू अनावर झाले.
फोटो : १२०२२०२१ कोल केएमसी अतिक्रम कारवाई ५
ओळी : महापालिका अधिकाऱ्यांनी विक्री थांबवा अन्यथा पोलिसांच्या मदतीने साहित्य जप्त केले जाईल, असा इशारा दिल्यानंतर विक्रेत्यांनी लावलेले साहित्य बाजूला करून घेतले.
फोटो : १२०२२०२१ कोल केएमसी अतिक्रम कारवाई६
ओळी : कोल्हापुरातील सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी महाद्वार चौकातील आवळे, रांगोळी विक्रेत्यांची समजूत काढल्यानंतर वादावर पडदा पडला.
छाया : आदित्य वेल्हाळ
ओळी :