महाद्वारवर रांगोळ्या, पणत्या विकून हवाई दलात भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:24 AM2021-04-11T04:24:19+5:302021-04-11T04:24:19+5:30
कोल्हापूर : घरची खाणारी तोंडे पाच. कमावते एकटे वडील. तेही खासगी कंपनीत. त्यामुळे ...
कोल्हापूर : घरची खाणारी तोंडे पाच. कमावते एकटे वडील. तेही खासगी कंपनीत. त्यामुळे सुटीत ही मुले महाद्वार रोडवर रांगोळी, पणत्या विकत होती; परंतु प्रामाणिक कष्टाला फळ मिळाले आणि या तीनही मुलांनी नंतरच्या आयुष्यात धवल अशी कामगिरी केली. कोल्हापुरातील शिरोळकर कुटुंबियांची ही प्रेरणादायी कथा.
शिरोळकर यांचे मूळ गाव चंदगड तालुक्यातील शिरोली. ५० वर्षांपासून ते कोल्हापुरात वास्तव्यास आहेत. यातील प्रभाकर शिरोळकर हे येथील एस. एम. घाडगे अँड सन्स कंपनीत नोकरीला. आई उषा या गृहिणी. राजोपाध्ये बोळातील पंत वाड्यात या सर्वांचे वास्तव्य. घरची परिस्थिती गरिबीची. त्यांना तीन मुले. मोठ्या नीलिमा वाडीकर ज्या महालक्ष्मी बँकेतून निवृत्त झाल्या आहेत. मधले संजय आणि धाकटे राजन. दिवाळीच्या सुटीत महाद्वार रोडवर ही मुले रांगोळी, पणत्या विकायची. न्यू हायस्कूलमधील शिकणाऱ्या या मुलांनी या कष्टाची लाज वाटून घेतली नाही.
हुशारीच्या जोरावर परीक्षा दिल्यानंतर संजय हे शासकीय नोकरीला लागले. ते सध्या कोल्हापूर येथे जिल्हा न्यायालयात सहायक अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत, तर त्यांच्या पत्नी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात सेवेत आहेत. राजन यांनी विवेकानंद कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर वालचंद कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनअरची पदवी घेतली आणि ते वायुदलात पायलट म्हणून दाखल झाले. ते सध्या बंगळुरू येथे ग्रुप कॅप्टन म्हणून कार्यरत आहेत. योगायोग असा की, त्यांचा विवाह झाला तो वायुदलातच विंग कमांडर म्हणून कार्यरत असलेल्या भाग्यश्री यांच्याशी. भाग्यश्री या शिलाँग येथे सेवेत आहेत. याच्याही पुढे जात राजन यांचा मुलगा रोहन हा एनडीएतून पायलट झाला असून, तो फ्लाइट लेफ्टनंट म्हणून पंजाबमध्ये सक्रिय आहे. त्यानेही आदिती या फ्लाइट लेफ्टनंटशी लग्न केले असून, ती कोलकाता येथे कार्यरत आहे.
चौकट
कोल्हापूरकरांसाठी अभिमान
कष्टाच्या बळावर ही हवाई झेप घेणाऱ्या राजन यांची ही वाटचाल एकीकडे प्रेरणादायी आहे, तर दुसरीकडे पत्नी, मुलगा आणि सून असे चौघे जण भारतीय वायुदलात सक्रिय असणे हीदेखील कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद अशीच घटना आहे. सध्या हे चौघेही देशाच्या चार कोपऱ्यांना देशसेवेत कार्यरत आहेत.
चौकट
कष्टाचे चीज झाले
परिस्थिती गरिबीची असल्याने आमच्या मुलांना जे पडेल ते काम केले. आम्हाला त्यावेळी वाईट वाटायचे; पण मेहता कंपनीसमोर बसून त्यांनी रांगोळी, पणत्या विकल्या. त्यांनी त्यावेळी जे कष्ट उपसले त्यामुळेच त्यांचे आयुष्य प्रकाशमान झाले, अशा भावना राजन यांच्या मातोश्री उषा शिरोळकर यांनी व्यक्त केल्या.
१००४२०२१ कोल राजन शिरोळकर
१००४२०२१ कोल भाग्यश्री शिरोळकर
१००४२०२१ कोल रोहन शिरोळकर
१००४२०२१ कोल आदिती शिरोळकर