Rangpanchami: मंत्री सतेज पाटीलांनी फेस पेंटिंग तर ऋतुराजने धरला ठेका, शारंग महोत्सवात तरुणाईची धमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 06:19 PM2022-03-22T18:19:15+5:302022-03-22T18:20:29+5:30
कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या अंतानंतर यंदाची ही रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी झाली
कळंबा : गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उत्तरच्या राजकीय धुळवडीतुन वेळात वेळ काढत शारंग महोत्सवात हजेरी लावून तरुणाईला रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महिलांच्या आग्रहाखातर मंत्री पाटील यांनी फेस पेंटिंग करून घेत चेहऱ्यावर दोन्ही बाजूंना तिरंगा काढून रंगपंचमीचा आनंद घेतला. तर दक्षिणचे युवा आमदार आमदार ऋतुराज पाटील यांनी डी.जे च्या गाण्यावर ठेका धरला. यावेळी महिला युवतींच्या जल्लोषाला एकच उधाण आले.
क्रेशर चौकात आयोजित शारंग महोत्सवात दक्षिणचे युवा आमदार ऋतुराज पाटलांचे दुपारी बारा वाजता आगमन होताच युवतींची सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली. कोरड्या रंगाची उधळण, रेनडान्स आणि डी जे च्या तालावर महिलांना मनमुराद आनंद घेताना पाहताच आपसूकच आमदार ऋतुराज पाटील यांनीही गाण्यावर ठेका धरला.
काही वेळानंतर याठिकाणी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचीही एंट्री झाली. मंत्री पाटील यांचे आगमन होताच पुन्हा उत्साहास उधाण आले आणि रंगपंचमीचा ज्वर शिगेला पोहोचला. गृहराज्यमंत्र्यांनी कोरोना नंतर आलेल्या रंगपंचमीच्या उत्सवाच्या शुभेच्छा देत महिलांच्या आग्रहाखातर फेस पेंटिंग करून घेतले. चेहऱ्यावर दोन्ही बाजूंना तिरंगा काढून घेत यावेळी रंगपंचमीचा आनंद घेतला.
कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या अंतानंतर यंदाची ही रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी झाली. शारंग महोत्सवात तर तरुणाईने उच्चांकी गर्दी केली होती. यावेळी पुष्पा चित्रपटातील गाण्यांवर बेभान होऊन नाचत महिलांनी रंगपंचमीचा आनंद लुटला. त्यांना साथ दिली निवेदिका मोनिका जाजू आणि डी जे स्टेला मसिन यांनी. यावेळी महिलांसाठी डान्स, उखाणे, फेसपेंटिंग आदी आकर्षक पारितोषिकांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
माजी नगरसेविका दीपा मगदूम, शोभा कवाळे, पूजा नाईनकवरे, मेहजबिन सुभेदार, प्रमिला देशमुख, प्रीती देशमुख यांच्या समवेत रंगपंचमीचा कारेक्रमाचा परिसरातील सुमारे हजारावर महिलांनी आनंद घेतला.