रणजीपटू विराजराजे निंबाळकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 09:17 PM2020-12-12T21:17:00+5:302020-12-12T21:18:33+5:30
cricket, kolhapur महाराष्ट्राचे रणजीपटू विराजराजे खंडेराव निंबाळकर (वय ६७, रा. नागाळा पार्क, विवेकानंद महाविद्यालय परिसर) यांचे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री उशिरा निधन झाले.
कोल्हापूर : महाराष्ट्राचे रणजीपटू विराजराजे खंडेराव निंबाळकर (वय ६७, रा. नागाळा पार्क, विवेकानंद महाविद्यालय परिसर) यांचे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
विराजराजे निंबाळकर यांनी पुण्याच्या शिवाजी मिलिटरी स्कूलमध्ये प्राथमिक, तर महाविद्यालयीन शिक्षण बडोदा येथे महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठमध्ये घेतले. बडोदा विद्यापीठाकडून चार वर्ष अंशुमन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ते क्रिकेट खेळले. ते सलामीस खेळण्यास येत होते. तसेच ऑफस्पीन गोलंदाजीही करीत होते.
१९७५ मध्ये रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांना महाराष्ट्र संघात स्थान मिळाले. या संघातून त्यांनी दोन सामने खेळले. याचवेळी सी. के. नायडू ट्रॉफीसाठी त्यांची उपकर्णधार म्हणून निवड झाली. निंबाळकर यांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देत अनेक खेळाडू घडविले.
यामध्ये शशी घोरपडे, ऋतुराज इंगळे, छत्रपती संभाजीराजे, मधुकर बामणे, नंदकुमार बामणे, सचिन उपाध्य, शकील शेख, ध्रुव केळवकर, राजेश केळवकर, अमृत शिंदे यांचा समावेश आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी जलतरण क्षेत्रात स्वत:ला झोकून दिले.
जयभावानी जलतरण तलाव आणि रेसिडेन्सी क्लबमधील जलतरण तलाववर ते प्रशिक्षक होते. येथील जलतरणपट्टूंनी एकत्र येऊन गतवर्षी विराज निंबाळकर स्विमींग ॲकॅडीची स्थापना केली आहे. निंबाळकर यांनी १९७७ मध्ये पॅकर्स क्रिकेट क्लबची स्थापना केली.