मराठी रसिक मनाला वेड लावणारी रणजित देसाईंची ‘स्वामी’ कादंबरी एकसष्ठीत
By समीर देशपांडे | Published: December 8, 2023 12:33 PM2023-12-08T12:33:39+5:302023-12-08T12:34:28+5:30
थोरल्या माधवराव पेशव्यांच्या अमर कहाणीच्या ३९ आवृत्या प्रकाशित
समीर देशपांडे
कोल्हापूर : मराठीतील पहिले ज्ञानपीठ विजेते प्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकर थोरल्या माधवराव पेशवे यांच्यावर कादंबरी लिहणार होते. नाव ठरले होते ‘अजिंक्य’. याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कोवाडचे सुपुत्र असलेल्या या लेखकाच्या मनातही माधवरावांवर कादंबरी लिहण्याचे घोळत होते. या लेखकानं थेट खांडेकरांच घर गाठलं. मनीचा मनसुबा सांगितला. खांडेकर इतक्या विशाल मनाचे की त्यांनी आपला जाहीर केलेला बेत थांबवला आणि या लेखकाला पेशव्यांवरील कादंबरी लिहण्यास संमती दिली. केवळ संमतीच नव्हे तर अभ्यासासाठी पुस्तकेही सुचवली.
नंतरचा इतिहास तमाम मराठी रसिक, वाचकांसमोर आहे. मराठी रसिक मनाला वेड लावणारी रणजित देसाई यांची ‘स्वामी’ आता एकसष्ठीत पदार्पण करती झाली आहे. आतापर्यंत ३९ आवृत्त्या आणि गुजराथी, हिंदी, ओरिया आणि कानडी भाषांमध्ये अनुवादित झालेल्या या कादंबरीने त्या काळात वाचकांना असे काही वेड लावले होते की रणजित देसाईंच्याच भाषेत ‘वाचकांकडून कादंबरी उचलली जाते, म्हणजे काय, याचा मला अनुभव नव्हता. तो या कादंबरीमुळे मिळाला.’
शनिवारवाड्यापासून ते रणांगणापर्यंतचे शब्दचित्र डोळ्यासमोर उभं करणाऱ्या या कादंबरीची सुरुवात देसाई यांनी ‘या तरुण पेशव्याचा अकाली मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी बसलेला घाव, त्यापुढे पानिपताचा आघात काहीच नाही.’
या प्रसिद्ध इतिहासकार ग्रॅंड डफ यांच्या अवतरणाने केली आहे. भाऊसाहेब खांडेकरांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना देसाई म्हणतात, माझ्या आयुष्यात एवढ्या मोठ्या मनाची माणसे मी फार थोडी पाहिली. ती. भाऊसाहेब खांडेकरांनी मला संमती दिली नसती, तर मी ही कादंबरी लिहावयास घेतली नसती. याच कादंबरीवरील ‘स्वामी’ दूरचित्रवाणी मालिकेलाही रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
रा.ज. देशमुख हे ‘स्वामी’चे पहिले प्रकाशक. गेली अनेक वर्षे मेहता पब्लिशिंग हाऊसकडून ही कांदबरी प्रकाशित केली जात आहे. पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये ‘ऋण’ या सदराखाली देसाई यांनी बेळगाव वाचनालय, जमखिंडी लायब्ररी, करवीर नगर वाचन मंदिर कोल्हापूर, केसरी ग्रंथालय, भारत इतिहास संशोधक मंडळ, मुक्तव्दार ग्रंथालय पुणे, डेक्कन कॉलेज लायब्ररी या संस्थांचा आवर्जून उल्लेख केला आहे. चंद्रकांत माडखोलकर, बाबासाहेब पुरंदरे, यशवंत हडप, के. जी. पाटील, पां. बा. कुंभार, करंबेळकरसारख्या मित्रांनी कादंबरीत उणीव राहू नये म्हणून सदैव आस्था बाळगली असाही उल्लेख ते करतात. १९६२ मध्ये रणजितदादांच्या ३४ व्या वर्षी ‘स्वामी’ प्रकाशित झाली आणि दोन वर्षातच या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. कोल्हापूरच्या सुपुत्राची ही साहित्य क्षेत्रातील नंतरच्या ‘श्रीमान योगी’कादंबरीने तर आभाळाला भिडली.
रविवारी पुण्यात कार्यक्रम
‘स्वामी’च्या एकसष्ठीनिमित्त रविवार दि. १० डिसेंबर रोजी पुण्यात टिळक स्मारक मंदिरात दुपारी ४ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुण्याचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, प्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस आणि देसाई कुटुंबीयांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.