हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून रणजित पाटील यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:18 AM2021-07-15T04:18:14+5:302021-07-15T04:18:14+5:30
सावर्डे : कत्तलीसाठी गोवंशाच्या घाटमार्गे होणाऱ्या बेकायदेशीर वाहतुकीवर केलेल्या कारवाईबद्दल गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांचा ...
सावर्डे : कत्तलीसाठी गोवंशाच्या घाटमार्गे होणाऱ्या बेकायदेशीर वाहतुकीवर केलेल्या कारवाईबद्दल गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांचा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सत्कार केला.
घाटमार्गे बेकायदेशीरपणे होत असलेली वाहतूक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दोन महिन्यांपूर्वी निदर्शनाला आणून दिली होती. यावेळी पाटील यांनी कारवाईचे आश्वासन दिले व दोन महिन्यांत पाच कारवाया केल्या.
गेली अनेक वर्षे कत्तलीसाठी गाय व गोवंशाची घाटमार्गाने वाहतूक सुरू आहे. पोलीस कारवाई होत नसल्याने येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते नेहमी स्वतःच कारवाई करतात. परिसरात अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. बेकायदेशीरपणे गोवंशाची होत असलेल्या वाहतुकीची बाब समोर येताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी वाहतुकीला लगाम घातली. विविध मार्गांनी सापळा रचून रात्री-अपरात्री जाऊन बेधडक कारवाया केल्या. दोन महिन्यांत पाच कारवाया केल्या. याप्रकरणी दहाजणांवर गुन्हे दाखल केले. गुन्हेगारांच्या गाड्या जप्त करून पंचवीस गायी व गोवंशाची मुक्तता केली व त्यांना जीवदान देऊन गोशाळेत आश्रय दिला. पाटील यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल सेवाव्रत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी उर्फ बंडा साळुंखे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा गोरक्षाप्रमुख तुकाराम मांडवकर, सतीश कुंभार, प्रवीण मांडवकर, धनाजी इंजुळकर, अरूण इंजुळकर, अक्षय बेलेकर, संतोष डवंग, अक्षय कुरणे, अभिषेक डांगे, सुनील पेंडकर, गौरव भालकर, सात्विक दंताळ, आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : कत्तलीसाठी बेकायदेशीरपणे होणारी गोवंश वाहतूक रोखून केलेल्या कारवाईबद्दल गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांचा सत्कार सेवाव्रत प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी साळुंखे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केला.