रणजित पवार, अनिल चव्हाण यांची विजयी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:01 PM2020-02-26T13:01:39+5:302020-02-26T13:03:02+5:30
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित केलेल्या कामगार केसरी खुल्या गटात रणजित पवारने सौरभ मुसळे याला, तर कुुमार केसरी गटात अमरसिंह पाटील याने मारुती माने याला गुणांवर मात करीत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
कोल्हापूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित केलेल्या कामगार केसरी खुल्या गटात रणजित पवारने सौरभ मुसळे याला, तर कुुमार केसरी गटात अमरसिंह पाटील याने मारुती माने याला गुणांवर मात करीत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
हलगीच्या कडकडाटात राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात मंगळवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत कामगार केसरी खुल्या गटातील सलामीची लढत सोनहिरा साखर कारखाना (सांगली) चा मल्ल रणजित पवार व विठ्ठल कार्पोरेशन (माढा, जि.सोलापूर) चा मल्ल सौरभ मुसळे यांच्यात झाली.
रणजितने सुरुवातीला सौरभवर भारंद्वाज डाव टाकून चितपट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून सौरभ सुटला. अखेरीस गुणांवर रणजितने बाजी मारत सलामीच्या विजयाची नोंद केली. दुसरी लढत क्रांती अग्रणी कुंडलचा मल्ल अनिल चव्हाण याने रणधीर खांडेकर याच्यावर मात केली. तर बिद्री साखर कारखान्याच्या अमरसिंह पाटील याने मारुती माने याचा गुणांवर पराभव करीत स्पर्धेत आगेकूच केली.
स्पर्धेत रणजित पवार व सौरभ मुसळे यांच्यातील सलामीची लढत खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते लावण्यात आली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, गोकुळचे चेअरमन रविंद्र आपटे, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानिमित्त कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. मुंबई कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांनी स्वागत, तर आभार सहायक कल्याण आयुक्त घनश्याम कुळमेथे यांनी मानले.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत विविध वजनीगटातील १५४ कुस्ती लढती झाल्या. बुधवारी दिवसभर स्पर्धेतील मुख्य लढती होणार आहेत. स्पर्धेसाठी पंच म्हणून संभाजी वरूटे, संभाजी पाटील, मारुती जाधव, बबन चौगले, बाबा शिरगावकर, राजाराम चौगले, प्रकाश खोत, बाळू मेटकर, तानाजी पाटील हे काम पहात आहेत.