रणजितसिंह डिसले घेणार ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:25 AM2021-02-11T04:25:39+5:302021-02-11T04:25:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या माध्यमातून राज्यात ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या माध्यमातून राज्यात ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. डिसले यांच्या कार्यातून शिक्षकांना प्रेरणा मिळावी तसेच शिक्षणातील आधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वांना परिचय व्हावा यासाठी ते मार्गदर्शन करतील. त्यातून शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल होण्यास मदत होईल, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण प्रयोग व असामान्य कार्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून ग्लोबल टिचर पुरस्काराने सन्मान झाला. डिसले यांनी १६ हजारपेक्षा अधिक शिक्षकांना मार्गदर्शन केले असून, राज्यातील शिक्षकांना त्याचा फायदा होत आहे. त्यांनी नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत. राज्यातील इतर शिक्षकांनाही त्यांच्या कामाची ओळख व्हावी, तसेच शिक्षकांना प्रेरणा मिळावी यासाठी ‘शिक्षक प्रेरणा कार्यशाळा’ हा उपक्रम सुरू करण्याचे शासनाने ठरविले आहे. या कार्यशाळांच्या माध्यमातून राज्यातील शिक्षकांना नवा आत्मविश्वास मिळून ते अधिक जोमाने काम करतील, त्याचप्रमाणे सरकारी शाळांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
सर्व जिल्हा परिषदांनी या उपक्रमामधून आपल्या जिल्ह्याचा कार्यक्रम निश्चित करावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन राज्यातील सर्व शाळांनी शिक्षणविषयक नवनवीन उपक्रम राबवावेत, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.