रंकाळा शुद्धिकरण १४ जूनपासून
By admin | Published: June 7, 2015 01:03 AM2015-06-07T01:03:54+5:302015-06-07T01:03:54+5:30
महापालिकेत सादरीकरण : आर्थिक बोजाविना प्रकल्प साकारणार
कोल्हापूर : मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेतर्फे (आय.सी.टी.) रंकाळ्यातील पाणी शुद्ध करण्याचा प्रकल्पास १४ जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. ‘हायड्रो डायनॅमिक कॅव्हिटेशन’ या तंत्रज्ञानावर आधारित पाण्याच्या करण्यात येणाऱ्या शुद्धिकरण प्रकल्पाचे आय.सी.टी.चे प्राध्यापक व प्रकल्प संशोधक डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी शनिवारी महापालिकेत सादरीकरण केले. यावेळी डॉ. पंडित यांनी पर्यावरण अभ्यासकांच्या प्रश्नांचे निराकरण केले. महापालिका या प्रकल्पासाठी फक्त वीजपुरवठा करणार आहे. सेवाभावी निधीतून संस्थेचे कुलगुरू व कोल्हापूरचे सुपुत्र जी. डी. यादव यांनी प्रकल्पासाठी लागणारा २५ लाखांचा निधी जमा केला आहे.
या प्रकल्पासाठी ३० बाय १५ फूट जागा व थ्री फेज ४० एचपी वीज तसेच एक आयआटीआय फिटर कामगार महापालिका पुरविणार आहे. प्रकल्पाद्वारे एका तासात एक दशलक्ष लिटर पाण्याचे शुद्धिकरण होईल. यात कोणत्याही रासायनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार नाही. रिअॅक्टरमध्ये सेकंदाच्या लाख भागापेक्षाही कमी वेळेत पाणी दहा हजार अंश सेल्सियस तापमानावर गरम होऊन थंड होईल. यावेळी पाण्यातील दूषित घटक मरून जातील. शेवाळ, हायसिंथ व इतर प्रदूषित घटकांचा पूर्णत: नाश केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात इराणी खणीतील पाणी शुद्ध केले जाणार आहे. पंधरा दिवस ते एक महिन्यात हे पाणी दृश्यस्वरूपात शुद्ध झालेले दिसेल, असे पंडित यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समिती सभापती आदिल फरास, आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त विजय खोराटे, जलअभियंता मनीष पवार, उदय गायकवाड, दिलीप देसाई, बुरहान नायकवडी, प्रा. अमर जाधव, प्रसाद मंत्री, केवल सांगरूळकर, रवी बांदिवडेकर, सुनील बत्तासे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)