रंकाळा - आरे एस.टी. बससेवा पूर्ववत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:18 AM2020-12-07T04:18:26+5:302020-12-07T04:18:26+5:30
माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालये सुरू झाली आहेत; मात्र करवीर तालुक्यातील पश्चिम भागातील ...
माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालये सुरू झाली आहेत; मात्र करवीर तालुक्यातील पश्चिम भागातील रंकाळा-आरे एसटी सेवा नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित राहावे लागत आहे, तर नागरिकांना व नोकरदारांना हळदीपर्यंत पायपीट करून एस.टी किंवा खासगी वडापचा आधार घ्यावा लागत आहे.
यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने रंकाळा आगारातून नियमित बससेवा सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
करवीर तालुक्यातील पश्चिम भागातून अनेक शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनी माध्यमिक उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर, भोगावती व अन्य ठिकाणी, तर अनेक प्रवासी प्रवास करीत असतात; परंतु कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एसटी बस सेवा पूर्णपणे बंद होती. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनमध्ये शीतलता आणूनही या ग्रामीण भागांमध्ये एसटी सेवा पूर्ववत सुरू झाली नाही. कित्येक गावांत आठ महिन्यांपासून गावामध्ये एसटीचे दर्शनही नाही. गेली दहा ते बारा दिवसांपासून शाळा व महाविद्यालय सुरू करण्यात आल्या आहेत, तर करवीरच्या पश्चिम भागातील एस.टी. बस सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना व प्रवाशांना पाच ते दहा किलोमीटर पायपीट करून खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे, तर एस.टी. बस सुरू नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे संभाजीनगर व रंकाळा बसस्थानक नियंत्रक कार्यालयाने याकडे लक्ष देऊन रंकाळा ते आरे व अन्य एस.टी. सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी करवीर तालुक्यातील पश्चिम भागातून होत आहे.