रंकाळा तटबंदीचे काम संथ

By Admin | Published: April 28, 2015 12:54 AM2015-04-28T00:54:01+5:302015-04-28T00:55:34+5:30

पावसाळ्यापूर्वी कामाचे आव्हान : किमान पातळीपर्यंत भिंतीचे काम होईल : प्रशासन

Rankala fortification slow down | रंकाळा तटबंदीचे काम संथ

रंकाळा तटबंदीचे काम संथ

googlenewsNext

कोल्हापूर : शहराचे भूषण आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रंकाळा तलावाची संरक्षक भिंत गेल्या वर्षभरात चार वेळा कोसळली. यानंतर पर्यावरणप्रेमींसह शहरवासीयांनी रोष व्यक्त करताच पश्चिमेकडील ही पडकी ९२ मीटरची भिंत काढून त्या जागी नवीन भिंत बांधण्याचे काम सुरू झाले. मात्र, कासवगतीने सुरू असलेले काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास रंकाळ्याच्या दुखण्यात आणखी भर पडणार आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी पाण्याच्या किमान पातळीपर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे कार्यकारी अभियंता एस. के. माने यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शालिनी पॅलेसच्या बाजूला असलेली रंकाळ्याची तटबंटी ठिसूळ झाल्याने दर दोन-तीन महिन्यांनी कोसळत होती. दगड एकमेकांपासून सुटू लागल्याने संपूर्ण तटबंदीलाच जलसमाधी मिळण्याचा धोका निर्माण झाला. पर्यटक दररोज मोठ्या संख्येने रंकाळ्याकडे उद्यानात फिरायला येतात. तटबंदीच्या बाजूने पर्यटक फिरत असतात. अशा धोकादायक तटबंदीवर लोक बसलेलेही असतात. त्यामुळे पर्यटकांच्या वर्दळीवेळी जर तलावाच्या तटबंदीचा भाग कोसळला, तर मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. ही तटबंदी उतरवून घ्या, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करा, असा तगादा नगरसेवकांसह रंकाळाप्रेमींनी प्रशासनाकडे लावला.
यानंतर सर्व परिसराची कोल्हापूर इंजिनिअरिंग व आर्किटेक्ट असोसिएशनच्या पथकाने पाहणी केली. ९० मीटरची तटबंदी तत्काळ उतरवून घेऊन भक्कम कॉँक्रीटची भिंत बांधण्याचा सल्ला दिला होता. पावसाळ्यापूर्वी भिंतीचे काम पूर्ण न केल्यास रंकाळ्यातील पाणी बाहेर पडण्याचा धोका सभागृहात
सदस्यांनी व्यक्त केला. रंकाळ्याबाबत प्रशासन उदासीन असल्याची टीका झाल्यानंतर अल्पकाळाची निविदा प्रसिद्ध करीत बी. के. पाटील कन्स्ट्रक्शन यांना भिंत बांधण्याचा ठेका देण्यात आला. गेल्या पंधरा दिवसांपासून भिंतीचे कामही सुरू झाले. ९० लाख रुपये खर्चून ९२ मीटर भिंत बांधण्यात येणार आहे.
नव्या भिंतीची उंची साडेपाच मीटर आहे, तर रुंदी किमान सहा फूट असणार आहे. मात्र, हे काम कासवगतीने सुरू असून पावसाळ्यात रंकाळ्याचे पाणी पश्चिमेकडील भुसभुशीत जमिनीला अडून झाडे व जमिनीच्या भागास मोठ्या प्रमाणात जलसमाधी मिळण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)


रंकाळ्याच्या पश्चिमेकडील भिंतीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा मानस आहे. सध्या फाउंडेशनचे काम सुरू आहे. कॉँक्रीटचा टप्पा झाल्यानंतर दगडी बांधकाम सुरू होईल. पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत पाण्याच्या किमान पातळीपर्यंत काम होईल. यानंतर अंतिम टप्प्यातील काम पावसातही करता येणे शक्य आहे.
- एस. के. माने, कार्यकारी अभियंता

Web Title: Rankala fortification slow down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.