पर्यटनदृष्या रंकाळा संवर्धन गरजेचे, संवर्धनाचा ठोस आराखडा नसल्याने तलावाला अवकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 11:44 AM2022-02-21T11:44:35+5:302022-02-21T11:45:11+5:30
रंकाळा तलावाचे जतन व संवर्धन करण्याकरिता राज्य सरकारकडून यापूर्वी आणि आत्ताही निधी मिळालेला आहे. परंतु हा सगळा निधी गेला कोठे? अशी विचारण्याची वेळ नागरिकांवर येते.
भारत चव्हाण
कोल्हापूर : गेली अनेक वर्षे शहराच्या सौदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलावाचे होत असलेले विद्रूपीकरण चिंताजनक आहे. या नैसर्गिक तलावाला अधिकाधिक सुंदर ठेवण्याऐवजी तलावातील पाण्याचे वाढत असलेले प्रदूषण, तलावात अधूनमधून मिसळणाऱ्या नाल्यातील सांडपाणी, त्याला बसलेला हातगाडीवाल्यांचा विळखा, संवर्धनाचा ठोस आराखडा नसणे यामुळे तलावाला अवकळा प्राप्त झाली आहे.
रंकाळा तलावाचे जतन व संवर्धन करण्याकरिता राज्य सरकारकडून यापूर्वी आणि आत्ताही निधी मिळालेला आहे. परंतु प्रामुख्याने कोणती कामे हाती घ्यावीत याचा प्राधान्यक्रमच ठरलेला नसल्यामुळे कामे पूर्ण झल्यानंतर हा सगळा निधी गेला कोठे? अशी विचारण्याची वेळ नागरिकांवर येते.
या आधी राष्ट्रीय नदी, सरोवर स्वच्छता अभियानमधून नऊ कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यातून परताळा परिसरातील सांडपाणी शालिनी पॅलेसच्या मागून तर शाम हौसिंग सोसायटी नाल्याचे सांडपाणी देवकर पाणंद, जुना वाशीनाका, रंकाळा टॉवर मार्गे दुधाळी प्रक्रिया केंद्राकडे वळविण्यात आले.
पण विद्युत पुरवठा खंडित होतो तेव्हा थेट तलावात सांडपाणी मिसळते. एक वर्षापूर्वी परताळ्याकडील ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे रंकाळ्यात सांडपाणी मिसळले. त्यावरून मानवी चुका आणि तांत्रिक बिघाडाने विद्युत पुरवठा खंडित झाला तर तलावात सांडपाणी मिसळून प्रदूषण होतेच. मग नऊ कोटी रुपये खर्च करून काय उपयोग झाला असा प्रश्न रंकाळाप्रेमींकडून विचारला जातो.
सध्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी तलावाच्या जतन व संवर्धनासाठी १५ कोटींचा निधी आणला आहे. या निधीतून केल्या जाणाऱ्या कामांच्या बाबतीत पर्यावरणप्रेमी, काही तज्ज्ञांचा आक्षेप आहे.
तलावाचा विकास करणे म्हणजे काय असा त्यांचा मूलभूत प्रश्न आहे. नवीन बांधकामे, बैठक व्यवस्था करण्याऐवजी तलावाचे नैसर्गिक सौदर्य जपण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा अपेक्षा त्यांच्या आहेत; पण महापालिकेचे अधिकारी कामांचा प्राधान्यक्रम ठरवितात आणि विकास कामे करतात असा अनुभव आहे.
कासवं गायब, माशांची संख्या कमी
एकेकाळी तलावाच्या काठावर तलावातील कासवे अंडी घालण्यासाठी येत. तलावात वेगवेगळ्या प्रकारचे सर्प होते. त्यांचा एक नैसर्गिक अधिवास होता. परंतु अलीकडे काठावर नागरिकांचा स्वैर संचार वाढल्यामुळे ही कासवं, सर्प दिसायची बंद झाली आहेत.
तलावाच्या काठावर उभे राहिले की पाण्यातील मासे डोळ्यांनी स्पष्ट दिसायचे. मरळ, तिलाप, ओमटी यासारख्या माशांची संख्या मोठी होती. सूर्यकिरण व ऑक्सिजन घेण्याकरिता जलचर प्राणी वरती यायचे तेव्हाचे दृष्य अतिशय नयनरम्य असायचे. आता तलावातील पाणी प्रदूषित झाल्यामुळे जलचरांची संख्या लक्षणीय कमी झाली आहे.
संध्यामठ झाला पांढरा
तलावातील संध्यामठाची एक उत्तम वास्तू आहे. अनेक वर्षे पाण्यात असल्यामुळे त्याचा काही भाग धोकादायक झाला आहे. संध्यामठावर अनेक पक्षी बसतात. तेथेच ते विष्ठा टाकतात. अनेक वर्षे ही विष्ठा साफ न केल्यामुळे संध्यामठाचा टॉप पांढरा झाला आहे.
हातगाड्यांची पर्यायी व्यवस्था आवश्यक
हातगाड्यांचा रंकाळा तलावाला अक्षरश विळखा पडला आहे. तलावावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांना, नागरिकांना खायला मिळायला पाहिजे ही गोष्ट जरी खरी असली तरी त्याची पर्यायी उत्तम व्यवस्था करणे आवश्यक आहे.
कसे झालेय विद्रूपीकरण
- तलावाच्या पूर्व, पश्चिम, उत्तर बाजूला प्रचंड प्रमाणात खाद्यपदार्थांच्या हातगाड्या
- तलावातील पाण्याला हिरवा रंग, पाण्याला दुर्गंधीही सुटलीय
- जलचर प्राण्यांची संख्या झालीय कमी
- तलावातील संचार करणाऱ्या विविध पक्षांची संख्या घटली
- तलावातील पाणी काही वर्षे वॉशआऊट न केल्यामुळे खराब