रंकाळा तलाव ओव्हरफ्लो , नागरिकांची प्रचंड गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:24+5:302021-07-23T04:16:24+5:30
कोल्हापूर : गेल्या दोन तीन दिवसांपासून धुवाधार कोसळणाऱ्या पावसामुळे ऐतिहासिक रंकाळा तलाव ओव्हरफ्लो झाला. रंकाळा टॉवर तसेच संध्यामठकडून तलावातील ...
कोल्हापूर : गेल्या दोन तीन दिवसांपासून धुवाधार कोसळणाऱ्या पावसामुळे ऐतिहासिक रंकाळा तलाव ओव्हरफ्लो झाला. रंकाळा टॉवर तसेच संध्यामठकडून तलावातील पाणी सायंकाळी सहानंतर बाहेर पडायला सुरुवात झाली. यापूर्वी रंकाळा तलाव २५ जुलै २००५ साली रात्री साडेअकरा वाजता असाच ओव्हरफ्लो झाला होता, त्याचीच पुनरावत्ती गुरुवारी झाली. तब्बल सोळा वर्षांनंतर टॉवरच्या बाजूने वाहणारे तलावातील पाणी पाहण्यास नागरिकांनी मोठी गर्दी केली.
शहर परिसरातील बोंद्रेनगर, आपटेनगर, साळोखेनगर, कळंबा कारागृह, टिंबर मार्केट आदी परिसरातील पावसाचे पाणी प्रत्येक वर्षी रंकाळा तलावात मिसळते. गेल्या दोन तीन दिवसांपासून शहरात धुवाधार पाऊस कोसळत असल्याने मोठ्या प्रमाणावर सांडपाणी रंकाळा तलावात मिसळत आहे. गुरुवारी सकाळी केवळ सहा ते सात इंच पाणी बाहेर पडायला कमी होते. दिवसभर जोराचा पाऊस सुरूच राहिल्याने सरनाईक कॉळनी, श्याम हौसिंग सोसायटी, परताळा परिसरातून तलावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले.
सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास तलावातील पाणी बाहेर पडायला सुरुवात झाली. दरम्यान, पाणी पातळी वाढत जाईल तशी नागरिकांतून उत्सुकता निर्माण झाली. मोठ्या संख्येने नागरिक रंकाळा टॉवर परिसरात जमायला लागले. तेथे प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे परिसरातील वाहतूकही ठप्प झाली. सायंकाळी महानगरपालिका तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी तलावास भेट देऊन नागरिकांना बाजूला करण्यास सुरुवात केली. टॉवरच्या बाजूने धबधब्यासारखे पाणी पडायला लागले.
यापूर्वी दि. २५ जुलै २००५ रोजी रात्री साडेअकरा वाजता रंकाळा तलावाचे पाणी बाहेर पडले होते. त्याही वेळी टॉवर, संध्यामठ व पद्माराजे उद्यान येथून पाणी बाहेर पडले होते. रंकाळा तलावाच्या पश्चिम बाजूकडील सांडव्याच्या बाजूच्या नाल्यात मोठ्या प्रमाणात खरमाती पडल्यामुळे तलावातील पाणी तेथून बाहेर पडले नाही. परिणामी पूर्वेकडून पाणी बाहेर पडले होते. तब्बल सोळा वर्षांनी हे पाणी पुन्हा पूर्वकडील बाजूने बाहेर पडले.
फोटो क्रमांक - २२०७२०२१-कोल-रंकाळा
ओळ - कोल्हापूर शहरातील रंकाळा तलाव ओव्हरफ्लो होऊन तलावातील पाणी गुरुवारी सायंकाळी बाहेर पडले. छाया : नसीर अत्तार