रंकाळा तलाव, सरनाईक कॉलनी बर्ड फ्लू अलर्ट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:23 AM2021-01-18T04:23:23+5:302021-01-18T04:23:23+5:30
कोल्हापूर : शहरातील रंकाळा तलाव, सरनाईक कॉलनी परिसर बर्ड फ्लू अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी ...
कोल्हापूर : शहरातील रंकाळा तलाव, सरनाईक कॉलनी परिसर बर्ड फ्लू अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी (दि. १६) हे आदेश काढले आहेत. गडहिंग्लज आणि चंदगड येथील तुर्केवाडी परिसरही अलर्ट झोन केले आहेत.
देशात बर्ड फ्लूची साथ आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून संबंधित विभागांना, पोल्ट्री व्यावसायिकांना आणि नागरिकांना यापूर्वीच आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. असे असतानाच रंकाळा तलाव येथे दोन पाणबदके आणि सरनाईक कॉलनी येथे एक कबुतर मृत्यू पावल्याचे आढळून आले. याचबरोबर गडहिंग्लज नगरपालिका क्षेत्रात दोन कावळे, चंदगड येथील तुर्केवाडी ग्रामपंचायत क्षेत्रात एक कावळा मृत झाल्याचे दिसून आल्याने प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली आहे.
चौकट
खबरदारीचे उपाय करण्याचे आदेश
मृत्यू झालेल्या पक्ष्यांचे अवशेष रोगनिदानासाठी पुणे, औंध येथील विभागीय रोग अन्वेषण विभाग येथे पाठविण्यात आले आहेत. त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूसदृश रोगाने झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर ही चार ठिकाणे अलर्ट झोन घोषित केली आहेत. या परिसरात खबरदारीचे उपाय व सर्व्हेक्षणाचे काम सुरू करून योग्य ती उपाययोजना तत्काळ करण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांना दिले आहेत.