रंकाळाप्रेमींनी तांबट कमान, रंकाळा परिसर केला स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 02:42 PM2020-05-27T14:42:08+5:302020-05-27T14:45:09+5:30
महानगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि शिवाजी पेठेतील खंडोबा देवालय मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी मंगळवारी संयुक्तपणे जुन्या वाशी नाक्याजवळील तांबट कमान, रंकाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.
कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि शिवाजी पेठेतील खंडोबा देवालय मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांनी मंगळवारी संयुक्तपणे जुन्या वाशी नाक्याजवळील तांबट कमान, रंकाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.
तांबट कमानीजवळ विसर्जन कुंड बांधण्यात आला असून, या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. याशिवाय कुंडाच्या भोवती गवत वाढलेले होते. खंडोबा देवालय तरुण मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी स्वत:हून रंकाळ्याच्या कचरा उठाव या मोहिमेत सकाळी सात वाजल्यापासून सामील झाले. छोटी छोटी मुले सुद्धा या मोहिमेत सहभागी झाली होती. पाण्यातील प्लास्टिक, कचरा, गाळसुद्धा या मुलांनी काढला.
रात्रीच्यावेळी दारू प्यायला तिथे लोक येतात आणि बाटल्या फोडून जातात, उतारे टाकत अन्नाची नासाडी करतात, याबद्दल या परिसरात नाराजी होती. येथून पुढे मंडळाचे कार्यकर्ते प्रबोधन करणार आहेत. रंकाळ्यावर दारू पिणार नाही आणि कोण असे दारू पित असतील तर त्यांना तिथे बसू देणार नाही, अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली.
काही महिला, शिक्षिका, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. या मोहिमेकरिता महापालिकेने जेसीबी डंपर आणि सफाई कर्मचारी दिले. आरोग्य निरीक्षक गीता हसूरकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली.
कोल्हापूर महानगरपालिका आणि शिवाजी पेठेतील खंडोबा देवालय मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तांबट कमान येथे स्वच्छता मोहीम राबविली.