रंकाळ्याची भिंत चौथ्यांदा कोसळली
By Admin | Published: February 9, 2015 12:22 AM2015-02-09T00:22:40+5:302015-02-09T00:39:09+5:30
आणखी ७० फूट लांब तटबंदीला धोका रंकाळाप्रेमींतून संतापाची लाट अस्मितेला भगदाड : प्रशासनाचे दुर्लक्ष
कोल्हापूर : शहराचे भूषण आणि पर्यटकांचे आक र्षण असलेल्या रंकाळा तलावाचे दुर्दैव काही संपेना. गेल्या वर्षभरात तीनवेळा रंकाळ्याची संरक्षक भिंत कोसळली. या पडलेल्या भगदाडाच्या कामाचा पत्ता नाही, तोपर्यंत रविवारी पहाटे पुन्हा एकदा भिंतीचा मोठ्या भागाने जलसमाधी घेतली. महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका रंकाळा तलावास बसत असल्याचा तीव्र संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे.वर्षभरात तलावाच्या पश्चिमेकडील बाजूच्या कोसळलेल्या तटबंदी दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू असतानाच रविवारी पहाटे तटबंदीचा आणखी एक भाग चौथ्यांदा कोसळला. यापूर्वी पडलेल्या भगदाडाच्या खालील भाग पाण्यात कोसळला होता. संरक्षक भिंतीसह ३० ते ३५ फुटांचा मोठा भाग पुन्हा पाण्यात कोसळला. महानगरपालिका प्रशासनाने वेळीच काही ठोस उपाययोजना राबविल्या नाहीत, तर मात्र रंकाळा उद्यानाकडील साधारण सत्तर ते ऐंशी फुटांपर्यंतची तटबंदी पुन्हा पाण्यात कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शालिनी पॅलेस ते नवनाथ मंदिर या परिसरातील तटबंदीच्या मजबुतीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे. अद्याप मजबुतीकरणाचे काम पूर्ण क्षमतेने सुरूच झालेले नाही. आता तर रंकाळ्याची संपूर्ण तटबंदी धोकादायक बनली आहे. शालिनी पॅलेस उद्यानातील बाजूने तटबंदीचा भाग दीड ते दोन फुटांनी खचलेला आहे वरील बाजूने तटबंदी वेडीवाकडी झाली आहे. कोणत्याही क्षणी ही तटबंदी कोसळू शकते. दगड एकमेकांपासून सुटत आहेत. रंकाळ्याकडे दररोज पर्यटक मोठ्या संख्येने उद्यानात फिरायला येतात. तटबंदीच्या बाजूने पर्यटक पायी चालत फिरतात. अशा धोकादायक तटबंदीवर लोक बसलेलेही असतात. त्यामुळे दिवसा पर्यटकांच्या वर्दळीवेळी जर तलावाच्या तटबंदीचा भाग कोसळला, तर मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)