इचलकरंजीत शस्त्रांचा धाक दाखवत ३५ लाखांची खंडणी वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:24 AM2021-08-29T04:24:58+5:302021-08-29T04:24:58+5:30
पतीसह एक साथीदार ताब्यात इचलकरंजी : सहकारी संस्थेतील आर्थिक देवाण-घेवाणीतून शस्त्रांचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी देत ३५ लाख ...
पतीसह एक साथीदार ताब्यात
इचलकरंजी : सहकारी संस्थेतील आर्थिक देवाण-घेवाणीतून शस्त्रांचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी देत ३५ लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी नगरसेविकेच्या पतीसह सहा जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार खासगी प्रकल्प सल्लागार मुस्ताक अहमद मन्सूर मुजावर (वय ४४ रा. सांगली रोड) यांनी दिली आहे.
याप्रकरणी मदन सीताराम जाधव व अमोल बळीराम अरसूळ (दोघे रा. दातार मळा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मुस्ताक अहमद मुजावर हे खाजगी प्रकल्प सल्लागार आहेत. मदन जाधव यांनी शुक्रवारी सकाळी मुजावर यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले. त्याठिकाणी मदन जाधव, अमोल अरसूळ, प्रणव पाटील व अन्य तिघे असे सहा जण ठाण मांडून होते. तुमच्यामुळे जाधव यांचे मेहुणे अभिजित व अमोल यांचे ५५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांनी मुजावर यांच्याकडे पैशांची मागणी केली. विरोध दाखवल्याने जाधव यांनी मारहाण केली तर, अनोळखी व्यक्तींनी मुजावर यांचे हात-पाय व तोंड दोरीने बांधले आणि बोटे तोडण्यासह ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी मुजावर यांचा मोबाईल काढून घेऊन त्यांच्या भावाशी संपर्क साधत मुजावर यांच्या दिलशाद गारमेंट संस्थेची ठेव मोडली. आणि चंद्रकला बळीराम ग्रुपच्या खात्यावर यातील एकूण ३३ लाख रुपये जमा करुन घेतले. तर अमोल अरसूळ याला रोख २ लाख दिले. असे एकूण ३५ लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याचे व मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.