संजय घोडावत यांच्याकडे मागितली पाच कोटींची खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:18 AM2021-06-29T04:18:17+5:302021-06-29T04:18:17+5:30
हातकणंगले : कर चुकवेगिरीचे दोन नंबरचे व्यवसाय बाहेर काढण्याची धमकी देत उद्योजक संजय घोडावत यांच्याकडे पाच कोटींची ...
हातकणंगले : कर चुकवेगिरीचे दोन नंबरचे व्यवसाय बाहेर काढण्याची धमकी देत उद्योजक संजय घोडावत यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या पी. व्ही. सिंग (रा दिल्ली ) व रमेश ठक्कर (रा. मुंबई) या दोघांवर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी रमेश ठक्कर याला एक लाख रुपये घेताना पोलिसांनी मुंबईत रंगेहात पकडले. ठक्कर याला इचलकरंजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी संजय दानचंद घोडावत (वय ५६, रा. यशवंत हौसिंग सोसायटी, जयसिंंगपूर ) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
संजय घोडावत ग्रुपने डी. आर. आय व जीएसटी चुकविली आहे. त्यामुळे धाड टाकून दोन नंबरचे धंदे बाहेर काढणार. तसे नको असेल तर पाच कोटी रुपयांची खंडणी द्या, अन्यथा घोडावत कुटुंबाला जिवे मारू, अशी धमकी पी.व्ही. सिंग व रमेश ठक्कर यांनी संजय घोडावत यांना फोन व व्हॉटसॲपच्या माध्यमातून दिली होती. संजय घोडावत यांनी पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी व हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक यांना याची माहिती दिली. त्यानुसार हातकणंगलेचे पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी एक पथक तयार करून ते मुंबईला पाठविले. या पथकाने रमेशकुमार प्रतापजी ठक्कर याला एक लाख रुपयाची खंडणी घेताना रंगेहात पकडले.