धक्कादायक ! कोविड केंद्रात निराधार अल्पवयीन मुलींवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 11:15 AM2021-06-17T11:15:49+5:302021-06-17T11:18:29+5:30
Crimenews Kolhapur : कोल्हापूर येथील महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या डीओटी कोविड केंद्रामध्ये एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन निराधार मुलीवर तिथे सेवेस असलेल्या वॉर्डबॉयनेच बलात्कार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत बाललैंगिक प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बलात्काराची घटना मेच्या अखेरीस घडली आहे. संबंधित मुलगी संस्थेत आल्यानंतर तिने याबद्दलची माहिती दिल्यावर बालकल्याण समितीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
कोल्हापूर : येथील महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या डीओटी कोविड केंद्रामध्ये एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन निराधार मुलीवर तिथे सेवेस असलेल्या वॉर्डबॉयनेच बलात्कार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत बाललैंगिक प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. बलात्काराची घटना मेच्या अखेरीस घडली आहे. संबंधित मुलगी संस्थेत आल्यानंतर तिने याबद्दलची माहिती दिल्यावर बालकल्याण समितीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
एका अनाथ-निराधार मुलींचे संगोपन करणाऱ्या या संस्थेतील १३ मुली १७ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्या. पुढच्या टप्प्यात तीन दिवसांनी आणखी तीन मुली पॉझिटिव्ह आल्या. त्या सर्वांना महापालिकेच्यावतीने शिवाजी विद्यापीठातील डीओटी विभागामध्ये चालवण्यात येणाऱ्या कोविड केंद्रात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्या देखभालीसाठी संस्थेने दोन काळजीवाहक महिलाही नियुक्त केल्या होत्या. परंतु कोरोना रुग्णांची जिथे व्यवस्था केली होती तिथे त्यांना सोडण्यात येत नव्हते. या वॉर्डबॉयने त्या मुलीस लग्नाचे आमिष दाखविले. संस्थेतील निराधार मुली नेहमीच प्रेमाच्या ओलाव्यास आसुसलेल्या असतात. त्यामुळे त्याचा गैरफायदा घेत त्याने या केंद्रातील खोलीमध्येच तिच्यावर बलात्कार केला.
अन्य मुलींकडून याची कुणकुण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना लागली. त्यांनी तातडीने याची माहिती बुधवारी सकाळीच बालकल्याण समितीला दिली. समितीच्या बैठकीत घडलेल्या घटनेची चौकशी करून राजारामपुरी पोलिसांना संबंधित वॉर्डबॉयवर बाललैंगिक प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याचा निर्णय झाला.
महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे संबंधितप्रकरणी गुन्हा नोंदवण्यासाठी आग्रह धरला. त्यानुसार पीडित मुलीचा जबाब घेऊन गुन्हा नोंदवण्याचे आदेश पोलिसांना दिले. या कायद्यान्वये संबंधित मुलीस जबाबासाठी पोलीस ठाण्यात बोलावता येत नाही. त्यामुळे संस्थेत जाऊन मुलीचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता
डीओटी कोविड केंद्रामध्येडी आणखी काही मुली अशाच प्रकरणी बळी पडल्या असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने समितीमार्फत चौकशी सुरू आहे, त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गतवर्षी याच डीओटी कोविड केंद्रामध्ये उपचार घेणा-या एका कोरोना पॉझिटिव्ह युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तेथील एका वॉर्डबॉयला बेदम मारहाण करण्याची घटना घडली होती. त्या वॉर्डबॉयवर त्याचवेळी राजारामपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर पुन्हा हा प्रकार उघडकीस आला आहे.