Kolhapur: गडहिंग्लजमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, परप्रांतीय दोघांविरुद्ध गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 12:46 PM2024-11-29T12:46:25+5:302024-11-29T12:46:45+5:30

एकजण ताब्यात, संतप्त जमावाकडून दुकानाची तोडफोड

Rape of minor girl in Gadhinglaj Kolhapur crime against two foreigners  | Kolhapur: गडहिंग्लजमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, परप्रांतीय दोघांविरुद्ध गुन्हा 

Kolhapur: गडहिंग्लजमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, परप्रांतीय दोघांविरुद्ध गुन्हा 

गडहिंग्लज : मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी परप्रांतीय दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित शहजाद शेख (रा. शंभरपूर, जि. गोंडा, उत्तर प्रदेश) व त्याला पळून जाण्यास मदत केल्याबद्दल बरकतअली रईस पाशा (रा. काजूबाग, गडहिंग्लज) अशी त्यांची नावे आहेत. बरकतअली याला ताब्यात घेतले असून शहजादच्या तपासासाठी पोलिस पथक रवाना केले आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी रामदास इंगवले यांनी पत्रकारांना दिली.

अधिक माहिती अशी, शहरातील कडगाव रोडवरील काजूबाग परिसरात ‘पीओपी’चे काम करणारे बरकतअली पाशा यांचे दुकान आहे. त्या दुकानाच्या परिसरात मोलमजुरी करणारे कुटुंब वास्तव्याला असून पीडित मुलगी शहरातील शाळेत पाचवीत शिकते.

आठवड्यापूर्वी आजारी असल्यामुळे पीडित मुलगी घरी एकटीच होती. तिचे आई-वडील मोलमजुरीसाठी बाहेर गेले होते. घराबाहेर भांडी घासत असताना शहजाद याने मोबाईलवर तिचे फोटो काढले. फोटो काढल्याचे लक्षात येताच तिने ते फोटो डिलीट करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने तिची लगट करण्याचा प्रयत्न केला होता. गुरुवारी (वय २८) संध्याकाळी पीडित मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच बरकतअली याने शहजादला जाब विचारून चोप दिला. त्यानंतर तो शहरातून पळून गेल्याची चर्चा सुरू झाली.

दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच संतप्त तरुण सायंकाळी शहरातील लक्ष्मी मंदिरात एकत्र आले. त्यानंतर घोषणाबाजी करत जमाव पोलिस ठाण्यासमोर आला. अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या व त्याला मदत करणाऱ्या त्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. गुन्हा दाखल केल्याशिवाय हटणार नाही, असे म्हणत पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला.

पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी संतप्त जमावाला शांत केले. पीडित मुलीच्या पालकांची फिर्याद घेऊन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. त्यामुळे कायदा हातात न घेता शांतता व सुव्यवस्था कायम राखावी, असे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही तासभर गोंधळ सुरूच होता. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मालकाच्या दुकानाची तोडफोड

पीओपी कारागिरीचा व्यवसाय करणारे बरकतअली हे सुमारे २५ वर्षे गडहिंग्लजमध्ये वास्तव्यास आहेत. काजूबाग परिसरात त्यांचे दुकान व साहित्याचे गोडावून आहे. त्याच्या कामगाराने केलेल्या गैरकृत्याची माहिती मिळताच संतप्त जमावाने त्याच्या दुकानावर हल्ला केला व दुकानातील साहित्याची तोडफोड केली.

संशयिताच्या शोधासाठी पथक रवाना

संशयित शहजाद हा दोन महिन्यांपूर्वी बरकतअली यांच्याकडे कामाला आला आहे. त्याच्या गैरकृत्याची माहिती मिळताच जाब विचारून त्यांनी त्याला चोप दिल्याने तो घाबरून पळून गेला. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

‘व्हॉटसॲप’वरून आवाहन

उत्तर प्रदेशातील पीओपी व्यावसायिकाच्या कामगाराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे. त्यामुळे परप्रांतीयांना गडहिंग्लजमधून हाकलून काढण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी लक्ष्मी मंदिरात जमावे, असे आवाहन व्हॉटस्ॲपवरून करण्यात आले होते. त्यामुळे संतप्त जमावात विविध व्यावसायिक आणि व्यापारीदेखील सहभागी झाले होते.

Web Title: Rape of minor girl in Gadhinglaj Kolhapur crime against two foreigners 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.