जिल्ह्यात दोन दिवसांत तब्बल १५ हजार जणांची रॅपिड ॲन्टिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:17 AM2021-06-21T04:17:43+5:302021-06-21T04:17:43+5:30

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापुरात येऊन कान टोचल्यानंतर जिल्हा प्रशासनाची यंत्रणा वेगाने कामाला ...

Rapid antigen of 15,000 people in two days in the district | जिल्ह्यात दोन दिवसांत तब्बल १५ हजार जणांची रॅपिड ॲन्टिजन

जिल्ह्यात दोन दिवसांत तब्बल १५ हजार जणांची रॅपिड ॲन्टिजन

Next

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापुरात येऊन कान टोचल्यानंतर जिल्हा प्रशासनाची यंत्रणा वेगाने कामाला लागली असून घरोघरी जाऊन, गावागावात रस्त्यावरच ॲन्टिजन टेस्ट केल्या जात आहेत. दोन दिवसांत तब्बल १५ हजार टेस्ट झाल्या असून यातून पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. त्यांचे अहवाल पुन्हा एकदा आरटीपीसीआर करण्यासाठी पाठवले जात आहेत, त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्यांची संख्याही वाढली आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा व मृत्यूचा दरही राज्यात सर्वाधिक असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सोमवारी (दि.१४) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी थेट कोल्हापूर गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेऊन चाचण्या वाढवा, हलगर्जीपणा करू नका अशी तंबीच देत लॉकडाऊनचे निर्बंध कडक करण्याचेही आदेश दिले. तरीदेखील चार दिवस प्रशासन सुस्तच होते. दरम्यान शुक्रवारी राज्य सरकारच्या आपत्ती प्राधिकरणकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीत कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटीचा व मृत्यूचा दरही १० टक्केंच्यावर राहिल्याने निर्बंधात कोणत्याही प्रकारची शिथिलता देणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. पुढील शुक्रवारी आपत्ती प्राधिकरणचा अहवाल येईपर्यंत सध्या सुरू असलेले निर्बंध सुरूच राहतील, असे आदेश काढून त्याप्रमाणे अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

दरम्यान चाचण्या दुप्पट करण्याचे उपमुख्यमंत्र्याचे आदेश मनावर घेत जिल्हा प्रशासनाने रॅपिड ॲन्टिजन टेस्टचा वेग वाढवला आहे. जास्त रुग्ण आढळणाऱ्या गावात, परिसरांचा शोध घेऊन घराघरात जाऊन तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. रस्त्यावर गर्दीच्या ठिकाणी देखील ॲन्टिजन किट घेऊन कर्मचारी नागरिकांना अडवून तपासणी करताना दिसत आहेत.

चौकट

डोेंगराळ भागातही तपासणी

दुर्गम डोंगराळ भागात देखील आरोग्य कर्मचारी तपासणी करण्यासाठी फिरत आहेत. तेथे मोबाईल रेंजची अडचण असलीतरी देखील तपासण्या करून नंतर त्याची माहिती अपलोड केली जात आहे.

चौकट

साथरोगामुळे तापाचे रुग्ण जास्त

गेले आठवडाभर कोसळणाऱ्या पावसामुळे सध्या डासांचा प्रादुर्भाव वाढला असून डेंग्यूची साथ वेगाने पसरत आहे. त्यातच नद्यांना पूर आल्याने पाणी लालभडक झाले आहे. तेच पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याने जुलाबासह तापाचीही साथ पसरत आहे. साथीच्या आजारामुळे ताप, खाेकला, जुलाबाचे रुग्ण वाढले आहेत. कोरोनाची लक्षणे देखील या साथ रोगांना साधर्म्य दर्शवणारीच असल्यामुळे ॲन्टिजन टेस्टद्वारे त्याची पडताळणी केली जात आहेत.

प्रतिक्रिया

आमचे कर्मचारी जोरदार पावसाची पर्वा न करता घरोघरी जाऊन तपासण्या करत आहेत. त्यांना मोबाईल रेंजच्याही अडचणींचा सामना करावा लागत आहे. शनिवार, रविवार सुट्टी असताना देखील ते काम करत आहेत, याचे कौतुक वाटते. नागरिकांनीही सहकार्य करून तपासणी करून घ्यावी.

दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

(फोटो-२००६२०२१-कोल-रॅपीड टेस्ट)

Web Title: Rapid antigen of 15,000 people in two days in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.