मुरगूडमध्ये कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:28 AM2021-04-30T04:28:32+5:302021-04-30T04:28:32+5:30
नगरपालिका कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत; पण कोणते ना कोणते कारण सांगून ...
नगरपालिका कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत; पण कोणते ना कोणते कारण सांगून नागरिक बिनधास्त्रपणे बाहेर फिरत आहेत. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला की, पळवाटा शोधल्या जात आहेत. सध्या शहरात दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या साठपर्यंत पोहोचली आहे. या आठवड्यातच ही संख्या वाढली आहे. शहरातील भोसले कॉलनीमध्ये कोरोना प्रसार वेगाने होत आहे. कापशी रस्त्याला लागून असलेल्या या उच्चभ्रू वस्तीमध्ये गेल्या काही दिवसांत तब्बल पंधरा रुग्ण सापडले असून, येथे वास्तव्यास असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही कॉलनी कोरोना हॉटस्पॉट बनण्याची शक्यता आहे.
जनावर बाजार भरतो त्याठिकाणी वस्तीस असलेल्या बाह्य कामगारांची संख्या जास्त आहे. शहरातील बांधकाम, चर खुदाई आदी ठिकाणी हे कामगार कार्यरत आहेत. याच वस्तीतील दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या कामगारांच्या संपर्कातील अन्य लोकांना शोधून त्यांचीही तपासणी प्रशासनाकडून केली जात आहे. कोरोना प्रतिबंध करण्यासाठी कडक पावले उचलली जातील, असे मुख्याधिकारी संजय गायकवाड, सपोनि. विकास बडवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी सांगितले.