महाविद्यालयांमध्ये पदवीचे वर्ग सुरू करण्याची वेगाने तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 11:09 AM2021-02-13T11:09:08+5:302021-02-13T11:57:02+5:30
College Kolhapur- राज्य शासन आणि शिवाजी विद्यापीठाच्या सूचनेनुसार पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सोमवार (दि. १२)पासून वर्ग सुरू करण्याची तयारी महाविद्यालयांकडून शुक्रवारपासून सुरू झाली. वर्ग आणि कॅम्पसचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
कोल्हापूर : राज्य शासन आणि शिवाजी विद्यापीठाच्या सूचनेनुसार पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे सोमवार (दि. १२)पासून वर्ग सुरू करण्याची तयारी महाविद्यालयांकडून शुक्रवारपासून सुरू झाली. वर्ग आणि कॅम्पसचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
वर्ग सुरू करण्याची सूचना विद्यापीठ प्रशासनाने ईमेलद्वारे महाविद्यालयांना गुरुवारी केल्या आहेत. त्यानुसार तयारी करण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विद्यापीठ संलग्नित बहुतांश महाविद्यालयांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
त्यानंतर वर्ग आणि कॅम्पसचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता, हात धुण्यासह सॅनिटायझर स्टँड, थर्मल गनने तपासणी करण्याची व्यवस्था करण्याचे काम महाविद्यालयांमध्ये सुरू झाले. रविवारी सुटी असल्याने शनिवारी सर्व तयारी पूर्ण करण्याचे नियोजन महाविद्यालयांनी केले आहे. महाविद्यालयांप्रमाणे विद्यापीठातील कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या अधिविभागांमध्ये वर्ग सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे.
महाविद्यालयांना सूचना
विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य शासन आणि शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांना विचार करून आमच्या समितीने वर्ग सुरू करण्याच्या शिफारस विद्यापीठ प्रशासनाला केली. त्यानुसार विद्यापीठाने अधिकार मंडळांची मान्यता घेऊन महाविद्यालयांना सूचना केल्या आहेत, अशी माहिती महाविद्यालये सुरू करण्याबाबतच्या विद्यापीठाच्या समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी दिली.
पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्याची तयारी आमच्या महाविद्यालयात सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती दक्षता घेऊन वर्ग सुरू केले जातील.
- डॉ. राजेंद्र लोखंडे,
प्राचार्य, महावीर महाविद्यालय
आकडेवारी दृष्टिक्षेप
- विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालये : २९३
- एकूण विद्यार्थी : २५६२४२
- मुले : १२७४२८
- मुली : १२१६६७
७५ टक्के उपस्थितीची अट शिथील
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची रोज वर्गातील उपस्थिती ५० टक्के ठेवायची आहे. त्याचा विचार करून विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) विद्यार्थ्यांची वर्गातील ७५ टक्के उपस्थितीची अट शिथील केली आहे. त्याबाबतची सूचना विद्यापीठाने अधिविभाग, संलग्नित महाविद्यालयांना ई-मेलद्वारे केली आहे.