कळंबा तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 08:24 PM2024-07-19T20:24:12+5:302024-07-19T20:24:25+5:30
पाणीपातळी पंधरा फुटांवर, तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहण्याची पर्यटकांना आस
अमर पाटील, कळंबा : गेल्या दोन दिवस रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने कळंबा तलावाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत राहिली होती . शुक्रवारी दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अवघ्या चार फुटांवर स्थिरावलेल्या तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन शुक्रवारी रात्री पाणीपातळी पंधरा फुटांवर पोहोचली कळंबा तलावाचे मुख्य जलस्तोत्र असणारे कात्यायनीच्या टेकड्यातून वाहणारे सातही नैसर्गिक नाले पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
तलावाची पाणीपातळी सत्तावीस फुटांवर पोहोचताच तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहू लागतो यंदा मार्चच्या मध्यावरच तलावाची पाणीपातळी चार फुटांवर गेल्याने पाणीउपसा बंद करण्यात आला होता. जून कोरडा गेला त्यात जुलैमध्ये सुद्धा पावसाने हुलकावणी दिल्याने उपनगरासह ग्रामस्थ हवालदिल झाले होते परंतु गेल्या दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसाने तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पुढील तीन दिवसांत दमदार पाऊस झाल्यास तलाव सांडव्या वरून ओसंडून वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांडव्या वरून ओसंडून वाहणाऱ्या तलावाची आता पर्यटकांना आस लागून राहिली आहे
नुसते पाणीपूजन नको उपसा नियोजन गरजेचे सत्तर लाखांची पाणीपट्टी बुडवणारी कळंबा ग्रामपंचायत प्रशासन प्रतिवर्षी तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला की प्रशासन पाणीपूजन करण्यात धन्यता मानते तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो वर्षभर पाणीउपसा किती करायचा याचे नियोजन करण्यात पालिका प्रशासन कमी पडते त्यामुळे डिसेंबरपासून पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो.
पाणलोट क्षेत्रातील बांधकामांनी घोटला तलावाचा श्वास तलावाचे मुख्य जलस्तोत्र असणारे कात्यायनीच्या टेकड्यांतून वाहणारे सात नैसर्गिक नाले बिल्डर लॉबीकडून गिळंकृत करण्याची स्पर्धाच लागली असून पाणलोट क्षेत्रातील बेकायदेशीर उभारण्यात आलेली हॉटेल्स, सिमेंट विटाचे दगडी कारखाने यामुळे तलाव अंतिम घटका मोजत असून ग्रामपंचायत प्रशासन प्राधिकरण लोकप्रतिनिधी यांना या ऐतिहासिक शाहू कालीन ठेवा जतन करण्यासाठीचे सोयरसुतक राहिले नाही.