जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने प्रसार, नवे २३१ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:26 AM2021-04-07T04:26:28+5:302021-04-07T04:26:28+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याचे स्पष्ट झाले असून, नवे २३१ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. सहा ...
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याचे स्पष्ट झाले असून, नवे २३१ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. सहा जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या कोल्हापूर शहरात नवे ११४ रुग्ण सापडले असून, नागरिकांनी दक्षता न घेतल्यास ही संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात १,२६९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून शंभर ते दोनशेदरम्यान नवे रुग्ण आढळत होते. मात्र, मंगळवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत एकदम २३१ रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागही काळजीत पडला आहे. भुदरगड तालुक्यात एक, गडहिंग्लज तीन, हातकणंगले बारा, कागल आठ, करवीर २०, पन्हाळा तीन, राधानगरी एक, शाहूवाडी पाच, शिरोळ सहा, नगरपालिका क्षेत्रातील ३२, इतर जिल्ह्यातील २६ आणि कोल्हापूर शहरामध्ये ११४, अशी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आजरा, चंदगड व गगनबावडा तालुक्यांत मात्र एकही रुग्ण सापडला नसल्याने त्या तालुक्यांना काहीसा दिलासा मिळाला.
दिवसभरात ६९६ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, १,८०२ जणांचे स्वॅब घेण्यात आले. २१२ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे. दिवसभरामध्ये ७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
चौकट
यांचा झाला मृत्यू
कोल्हापुरातील नागाळा पार्कमधील ७२ वर्षीय महिला, संभाजीनगरातील ९५ वर्षीय महिला, शनिवार पेठेतील ३६ वर्षीय महिला, सम्राटनगर येथील ८५ वर्षीय पुरुष, हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील ७० वर्षीय महिला, करवीर तालुक्यातील शिये येथील ६५ वर्षीय पुरुष, अशा सहा कोरोनाग्रस्तांचा मंगळवारी मृत्यू झाला.
चौकट
बेफिकिरी महागात पडणार
एकीकडे प्रशासनाने काही नियम घालून दिले असताना ते डावलण्याचे काम सुरू आहे; परंतु कोल्हापूर जिल्ह्यात सध्या रुग्णसंख्या कमी आहे. त्यामुळे अनेकांची बेफिकिरी सुरू आहे. ती अशीच सुरू राहिली, तर मात्र कोल्हापूरमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.