‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’होत नसल्याने कोरोनाचा झपाट्याने प्रसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:22 AM2021-04-19T04:22:05+5:302021-04-19T04:22:05+5:30
कोल्हापूर शहर असो अथवा ग्रामीण भागातील एखादे गाव असो त्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्यानंतर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जास्त धोका ...
कोल्हापूर शहर असो अथवा ग्रामीण भागातील एखादे गाव असो त्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळल्यानंतर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या जास्त धोका व कमी धोका असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या तातडीने कोरोना चाचण्या करणे आणि त्यांना संस्थात्मक विलगीकरण अथवा रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये दाखल करणे अत्यंत आवश्यक असते.
कोल्हापूर जिल्ह्यात जेव्हा कोरोनाचा प्रसार सुरू झाला तेव्हा ही प्रक्रिया अतिशय काटेकारपणे सुरू होती. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास लगेच आरोग्य यंत्रणा कामाला लागत होती. रुग्णांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींना रुग्णवाहिकेत घालून सक्तीने त्यांना स्वॅब तपासणीला नेले जात होते. स्वॅब तपासणी अहवाल येईपर्यंत संस्थात्मक अलगीकरण केंद्रात दाखल केले जात होते. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांना रुग्णालयात, तर निगेटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तींचे गृहअलगीकरण केले जात होते. त्या व्यक्तींवर प्रभाग सचिव, ग्रामसचिव यांचे नियंत्रण असायचे.
परंतु दुसरी लाट आल्यापासून आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने या गोष्टीकडे फारसे गांभीर्याने पाहिलेले नाही. पॉझिटिव्ह रुग्णाच्या नातेवाइकांचीही तपासणी करा म्हणून कोणी सांगायला जात नाही. काही जागरुक नागरिक स्वत:हून स्वॅब तपासणी करून घेतात, पण हे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह असणारे असंख्य व्यक्ती केवळ ट्रेसिंग न झाल्यामुळे गावभर फिरून कोरोनाचा प्रसार वाढविण्यास हातभार लावत आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात मोठी ढिलाई होत असून तीच रुग्ण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.
पॉईंटर -
(टीप - आकडे दि. १५ एप्रिलपर्यंत)
- कोल्हापूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण - ५६ हजार १३५
- पॉझिटिव्ह रेट - १३.१४ टक्के
- ॲक्टिव्ह रुग्ण रेट - ५.६१
-रिकव्हरी रेट - ९१.०८
- डेट रेट - ३.३
-कॉन्टॅक्ट ट्रेसिंग रेट - १५.३८
आतापर्यंत झालेल्या चाचण्या व रुग्ण -
चाचणी प्रकार रुग्ण संख्या
- सीबीनेट - २४१७
- रॅपिड ॲन्टिजेन - ६२,०५७
- आरटीपीसीआर - ३,५५,७१२
- ट्रूनेट चाचणी - ७१७३
- एकूण - ४ लाख २७ हजार ३५९
-