गगनबावड्यात आढळला चामेलियो झेलेनिनिकस या दुर्मीळ प्रजातीचा सरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:25 AM2021-07-28T04:25:04+5:302021-07-28T04:25:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : गगनबावडाच्या सौंदर्यात आणखी एका कीटकवंशीय प्राण्याची भर पडली आहे. अनेकविध दुर्मीळ पशू, पक्षी, प्राणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धामोड : गगनबावडाच्या सौंदर्यात आणखी एका कीटकवंशीय प्राण्याची भर पडली आहे. अनेकविध दुर्मीळ पशू, पक्षी, प्राणी यांच्या अस्तित्वासाठी या तालुक्यातील वनसंपदा पोषक ठरते आहे. थंडगार हवा, घनदाट झाडी, तुरळक मानवी वस्ती यामुळे येथे विविध प्राणी, पक्षी, कीटक यांचा अधिवास अढळतो. विविध देशांमध्ये अधिवासासाठी परिचित असणारे पक्षी, प्राणी या तालुक्याच्या निसर्गरम्य परिसरात आढळतात.
या तालुक्याच्या निसर्ग संपदेत ही भर टाकणारी दिलासादायक बाब आहे. सोमवारी पदभ्रंमतीदरम्यान चामेलियो झेलेनिनिकस हा दुर्मीळ कीटक प्रजातीचा सरडा आढळला.
हा सरडा भारतीय रंगीत सरडा म्हणूनही ओळखला जातो. याला शास्त्रीय भाषेत चामेलियो झेलेनिनिकस या नावाने ओळखले जाते. हा सरडा विशेषतः श्रीलंका, भारत आणि दक्षिण आशियातील इतर भागांत आढळणाऱ्या सरड्याची एक प्रजाती आहे. इतर सरड्यांप्रमाणेच या प्रजातीची जीभ लांब असते व पायाला दोनच बोटे असतात. त्यांचा आकार चिमट्यासारखा असतो. तो आपल्या शेपटीनेदेखील फांदीला पकडू शकतो. अशा विशिष्ट पद्धतीची त्याच्या शेपटीची रचना असते. त्याला इंग्लिशमध्ये (Prehensile Tail ) असे म्हणतात. डोळ्यांची स्वतंत्र हालचाल आणि त्वचेचा रंग बदलण्याची क्षमता या सरड्यामध्ये असते. तो आपले डोळ वर-खाली करीत डुलत हळुवारपणे चालतो.
हा सरडा जास्तीत जास्त वेळ झाडावरच असतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो पार्श्वभूमी रंग निवडत नाही आणि कदाचित रंगफरकदेखील समजू शकणार नाही. तो सरडा सहसा हिरव्या किंवा तपकिरी रंगाचा पट्टे असलेला आढळतो. हा सरडा आपला रंग वेगाने बदलू शकतो. या सरड्याचे रंग बदलण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे इतर सरड्यांशी संवाद साधणे आणि उष्णता शोषणासाठी गडद रंगात बदलून शरीराचे तापमान नियंत्रित करणे हे असते. या सरड्याची नाकापासून शेपटीच्या सुरुवातीपर्यंतची लांबी ७ इंच, तर शेपूट ८ इंचाचे असते. गगनबावडा तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस पदभ्रमंतीदरम्यान येथील नायब तहसीलदार संजय वळवी, महसूल सहायक विजय पारधी, अवधूत खापणे यांना सरडा आढळून आला.