शाहूवाडीत आढळला दुर्मिळ जातीचा साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 11:25 AM2021-11-30T11:25:26+5:302021-11-30T11:39:32+5:30
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील सावर्डे बुद्रुक येथे दुर्मिळ जातीचा साप आढळला. पशू, पक्षी, वन्यजीव बचाव कर्ता व वन्यजीव अभ्यासक ...
कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील सावर्डे बुद्रुक येथे दुर्मिळ जातीचा साप आढळला. पशू, पक्षी, वन्यजीव बचाव कर्ता व वन्यजीव अभ्यासक किरण खोत यांना हा साप आढळला. तो जखमी झाल्याने त्याला खोत यांनी वन विभागाच्या उपचार केंद्रांत दाखल केले. वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकर त्या सापावर उपचार करीत आहेत.
शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास त्या सापाचे बचाव कार्य करताना खोत यांना तो अनोळखी वाटला. त्यांनी सापाची ओळख पटविण्यासाठी तज्ज्ञांशी संपर्क साधला. तज्ज्ञांनी हा साप दुर्मिळ असल्याचे सांगितले. त्या सापाला ऑलिव फॉरेस्ट असे म्हणतात, असे खोत यांना सांगण्यात आले. कर्नाटक, केरळ, तमिळनाडू व महाराष्ट्रात पश्चिम घाटात तो आढळतो.
पश्चिम घाटात कोयना, आंबोली या ठिकाणी त्याची नोंद आहे. पण हा साप प्रथमच सावर्डे बुद्रुक या ठिकाणी आढळून आला आहे. त्या सापाच्या मागील भागाची हालचाल होत नाही, असे बचाव करताना खोत यांच्या निदर्शनास आले. मनके तुटल्यामुळे मागील बाजूस अपंग झाल्याने उपचारासाठी खोत यांनी वन प्रशासनाशी संपर्क साधला. त्यास उपचारासाठी केंद्रात दाखल करण्यात आले. यासाठी उपवनसंरक्षक रावसाहेब काळे, सहायक वनसंरक्षक सुनील निकम, वनक्षेत्रपाल अमित भोसले, अमित कुंभार यांनी मदत केली.