‘कनवा’मध्ये ग्रंथसंपदेचा दुर्मीळ खजिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:48 AM2019-05-06T00:48:28+5:302019-05-06T00:48:32+5:30

इंदूमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूरच्या वाचनसंस्कृतीची गंगोत्री असलेले आणि शतकोत्तर हीरकमहोत्सवी साजरे करणारे करवीर नगर ...

The rare treasure of the book in 'Kanwa' | ‘कनवा’मध्ये ग्रंथसंपदेचा दुर्मीळ खजिना

‘कनवा’मध्ये ग्रंथसंपदेचा दुर्मीळ खजिना

Next


इंदूमती गणेश ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूरच्या वाचनसंस्कृतीची गंगोत्री असलेले आणि शतकोत्तर हीरकमहोत्सवी साजरे करणारे करवीर नगर वाचन मंदिर म्हणजे ग्रंथसंपदेचा दुर्मीळ खजिना. प्राचीन हस्तलिखिते, मराठी इंग्रजी साहित्य अशा दीड लाखांहून अधिक पुस्तकांनी समृद्ध असलेल्या या संस्थेने आधुनिकतेची कास धरीत वाचन मंदिराच्या विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. पुढील वर्षभरात प्रिन्स शिवाजी हॉलसह नूतन वास्तू व नवनवीन उपक्रमांची नांदी देत संस्था नव्या दिमाखात सेवेत असणार आहे.
कोल्हापूरच्या साहित्यिक व सांस्कृतिक जडणघडणीत करवीर नगर वाचन मंदिरचे नाव प्रथम क्रमांकावर येते. तत्कालीन पोलिटिकल सुपरिंटेंडेंट कर्नल एच. एल. अँडरसन यांनी १५ जून १८५० साली या संस्थेची स्थापन केली. त्यासाठी करवीर सरकार व श्रीमंत नागरिकांनी पाच हजारांची देणगी दिली. १७ सभासद आणि ४४२ ग्रंथांच्या साहाय्याने या ‘कोल्हापूर नेटिव्ह लायब्ररी'ची सुरुवात झाली. पुढे १८६७ साली युरोपियन लोकांनी आपली स्वतंत्र लायब्ररी काढल्यानंतर या ग्रंथालयाचे व्यवस्थापन स्थानिक नागरिकांकडे आले. वाढती ग्रंथसंपदा आणि भविष्याचा विचार करून १८८१ साली २७ हजार रुपये खर्चून नवी इमारत बांधण्यात आली. १९२४-२५ साली ‘कोल्हापूर जनरल लायब्ररी’ आणि पुढे १९३४ साली ‘करवीर नगर वाचन मंदिर’ असे संस्थेचे नामकरण करण्यात आले. ज्ञानप्रसाराच्या माध्यमातून समाजप्रबोधन, लोकशिक्षण आणि राजकीय जागृतीचे कार्य या ग्रंथालयाने पार पाडले.
राजर्षी शाहू महाराज हे संस्थेचे पहिले आश्रयदाते होते. त्यांच्यानंतर राजाराम महाराज हे संस्थेचे पेट्रन झाले. त्यानंतरही कोल्हापूर संस्थानच्या वतीने ग्रंथालयास सर्वप्रकारचे सहकार्य केले जात असे. स्वामी विवेकानंदांनीही आॅक्टोबर १८९२ मध्ये संस्थेला भेट दिली आहे. देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, प्रा. ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, माधव ज्यूलियन, गंगाधर गाडगीळ, शिवाजी सावंत अशा अनेक साहित्यिकांचे या ग्रंथालयास योगदान लाभले आहे. नावीन्याचा ध्यास घेत प्रगतीची वाट चोखाळणाऱ्या या १६८ वर्षांच्या ज्ञानवृक्षाच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श ग्रंथालय पुरस्कार,’ तसेच शतकोत्तर ग्रंथालयांच्या संमेलनात ‘आदर्श ग्रंथालय पुरस्कार’ही संस्थेस मिळाला.

आधुनिकतेची कास
बदलत्या काळानुसार संस्थेनेही आपल्या कार्यपद्धतीचे आधुनिकीकरण केले आहे. येथे पुस्तके ठेवण्यासाठी ‘कॉम्पॅक्टर’ ही आधुनिक कपाटे लावण्यात आली असून, त्यात दीड लाख पुस्तके सामावली आहेत. असे कॉम्पॅक्टर असलेले राज्यातील हे एकमेव वाचनालय आहे. वाचनालयाचे काम संगणकीकृत केले आहे. अंध वाचकांसाठी ब्रेल साहित्य, ग्रंथप्रसिद्धी, कुरिअर, आॅनलाईन फॉर्म सुविधा, स्पर्धा परीक्षा वाचन कक्ष, गाव तेथे ग्रंथालय ही साखळी योजना, वि. स. खांडेकर व्याख्यानमाला, बालवाचन संस्कार शिबिर, विभागीय साहित्य संमेलन, लेखक आपल्या भेटीला असे उपक्रम संस्थेतर्फे राबविले जातात. याशिवाय कोल्हापुरातील युवक-युवतींना रोजगार मिळावा, यासाठी विशेष प्रशिक्षण व प्लेसमेंटही देण्यात येणार आहे.

प्रिन्स शिवाजी हॉल
नव्या दिमाखात
शाहू महाराजांचे पुत्र प्रिन्स शिवाजी महाराज यांच्या स्मृती जपणारा प्रिन्स शिवाजी रीडिंग हॉल नव्याने साकारला जात आहे. वर्षभरापूर्वी हॉलच्या इमारतीची पायाभरणी झाली. मुख्य इमारतीच्या डोमचे काम सुरू आहे. मागील तीन मजली इमारतीचे स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. एप्रिल २०२० पर्यंत नवी वास्तू सेवेसाठी सज्ज होणार आहे. यात महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, अभ्यासिका, हॅलो कनवा रेडिओ केंद्र, ग्रंथ विभाग आदी विभाग असणार आहेत.

Web Title: The rare treasure of the book in 'Kanwa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.