दाजीपूरच्या जंगलात दुर्मीळ वाघाटीचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 04:40 AM2020-01-08T04:40:34+5:302020-01-08T04:40:42+5:30
राधानगरी तालुक्यातील दाजीपूरच्या जंगलात दुर्मीळ वाघाटीचे (रानमांजर, लेपर्ड कॅट) दर्शन झाल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील दाजीपूरच्या जंगलात दुर्मीळ वाघाटीचे (रानमांजर, लेपर्ड कॅट) दर्शन झाल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. गेल्याच आठवड्यात ठाणे येथून आलेल्या दाम्पत्याला भर दुपारी या वाघाटीचे दर्शन झाले. या दुर्मीळ प्राण्यांच्या दर्शनामुळे दाजीपूरच्या जंगलाचे जैवविविधतेतील महत्त्वपूर्ण स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दाजीपूरचे हे जंगल युनेस्कोने ‘जागतिक निसर्ग वारसास्थळ’ म्हणून घोषित केले आहे. या जंगलात वेगवेगळे प्राणी, पक्षी, फुलपाखरे, वनस्पतींचा आढळ आहे. येथे ३५ पेक्षा अधिक प्रकारचे प्राणी आहेत; परंतु येथील जंगल सफारीदरम्यान प्राणी दर्शन होत नाही, म्हणून अनेक पर्यटक नाराज होतात.
काही पर्यटकांना मात्र, नेहमी गवा, सांबर, भेकर, डुक्कर, वानर यांसारखे वेगवेगळे प्राणीदर्शन होते. ठाण्यातील पूनम आणि निर्मलकुमार कुर्वे या दाम्पत्याला शनिवारी दाजीपूरच्या जंगलामध्ये १५ मिनिटे ‘वाघाटी’चे दर्शन झाले. या परिसरात त्यांना १०० ते २०० फुलपाखरांचा थवाही दिसला.
>वाघाटी म्हणजे कोण?
‘वाघाटी’ हे घरगुती मांजराच्या आकाराचे रानमांजर आहे. याचा रंग व अंगावरील ठिपके हे बिबट्याप्रमाणेच असतात आणि ते बिबट्याची हुबेहुब लहान प्रतिकृतीच वाटते; परंतु हा मार्जार कुळातील प्राणी आहे. याचा वावर ब्रह्मदेश, थायलंड, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा इत्यादी देशांत आहे. कर्नाटक आणि केरळमधील सह्याद्रीच्या रांगांत या प्राण्याची उपजात आढळून येते. वाघाटीचे दर्शन दुर्मीळ असते. दाट जंगलझाडी असलेल्या प्रदेशातच यांचा अधिवास असतो.
>जंगल सफारी करताना गेल्या आठवड्यात भरदुपारी आम्हाला रस्त्याच्या मधोमध बसलेले हे वाघाटी दिसले, अतिशय दुर्मीळ असलेले हे वाघाटी पाहून आम्हाला खूप आनंद झाला. दुरून पाहताना बिबट्याचा बछडाच वाटत होता; पण जवळून पाहिल्यानंतर ते वाघाटी असल्याचं लक्षात आले. एक अविस्मरणीय अनुभव या जंगलाने आम्हाला दिला.
- डॉ. प्रा. पूनम कुर्वे,
समन्वयक, डिपार्टमेंट आॅफ बायोडायव्हेर्सिटी वाईल्डलाईफ कंझर्वेशन अँड मॅनेजमेंट, बांदोडकर कॉलेज आॅफ सायन्स, ठाणे