पोर्ले परिसरात दुर्मीळ कासारगोमचा वावर- : अन्नसाखळीचा महत्त्वपूर्ण भाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 09:30 PM2019-05-17T21:30:55+5:302019-05-17T21:32:22+5:30
शेतवडीसह मानवी वस्तीच्या आजूबाजूला आढळणारी साधी गोम कानात जाऊ नये म्हणून दिसताक्षणी तिला चिरडून मारल्याचे अनेकवेळा पाहावयास मिळते; परंतु आपल्या विषग्रंथीने शत्रूला घायाळ करून त्याला भक्ष्य बनविणारी कासारगोम दुर्मीळ होत आहे.
सरदार चौगुले ।
पोर्ले तर्फ ठाणे : शेतवडीसह मानवी वस्तीच्या आजूबाजूला आढळणारी साधी गोम कानात जाऊ नये म्हणून दिसताक्षणी तिला चिरडून मारल्याचे अनेकवेळा पाहावयास मिळते; परंतु आपल्या विषग्रंथीने शत्रूला घायाळ करून त्याला भक्ष्य बनविणारी कासारगोम दुर्मीळ होत आहे. पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथील परशराम नावाच्या टेकडीवर शेतीची मशागत करताना शेतकरी महिलेच्या पायाला ही गोम डसली होती. त्यामुळे या परिसरात कासारगोमेचा वावर असल्याचे समोर आले आहे.
‘स्कोलोपिन्ड्रीया गिंगनाटिया’ असे कासारगोमेचे शास्त्रीय नाव आहे. उंच टेकडीवर कड्ड्या-कपारित अथवा पालापाचोळ्यात तिचा आदिवास आढळून येतो. पश्चिम घाटातील चांदोली डोंगर, प्रचितीगड, पन्हाळागड, सह्याद्री घाटाच्या उंच टेकडीवर कासारगोम आढळून आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कासारगोमेची शत्रूला मारण्यासाठी वापरली जाणारी प्रक्रिया फसव्या स्वरूपाची असल्याने सावजाची शिकार तितक्याच शिताफीने करते. तिच्या डोक्याजवळील डोळ्याच्या खाली गोलाकार चिमट्याच्या आकाराचे दोन नांग्या आहेत. त्याचा उपयोग शत्रूवर हल्ला करण्यासाठी आणि भक्ष्य पकडून ठेवण्यासाठी होतो. विष प्रयोगाने जीवजतूंना भक्ष्यस्थानी बनविणाऱ्या कासारगोमेची विषबाधा होऊन मनुष्याचा मृत्यू झाल्याची कुठेही नोंद सापडत नाही.
कासारगोमेची लांबी
कासारगोमेची लांबी ८ इंच ते १५ इंचांपर्यंत असते. तिच्या पाठीवर तांबडे, पिवळे आणि काळ्या रंगांच्या खवल्यासारख्या २१ प्लेटा दिसून येतात. खालचे-वरचे खवले (सेगमेंट) एकमेकांना जोडलेले आहेत. शत्रूची चाहूल ओळखण्यासाठी तोंडाला लागून दीड-दोन इंच लांबीच्या अतिसंवेदनशील स्फू र्शा आहेत. दोन्ही खवल्यांच्या मध्यभागी खाच असते. त्यातूनच पोटाकडील बाजूला दोन पाय बाहेर दिसतात. खवल्यांप्रमाणे एकवीस पायांच्या जोड्या आहेत. पहिल्या पायाची जोडी विषबाधित, शेवटची पायजोडी शत्रूला फसविण्यासाठी, उर्वरित सरपटण्यासाठी उपयोग केला जातो.
शत्रूवर शिताफीने हल्ला
कासारगोम सावजाला शिताफीने पकडते. शत्रंूची चाहूल लागली की, मुख्य तोंडाचा भाग लपवून ठेवते आणि शेपटीकडील दोन्ही पायांची हालचाल करीत राहते. त्यामुळे शत्रू त्याकडे आकर्षला जातो. त्यानंतर शत्रूवर विषग्रंथी नांग्याने जखडून, त्याच्यावर हल्ला करीत त्याला भक्ष्य बनविले जाते. आशा प्रकारे फसवून सावजाची शिकार होते.
असा केला जातो विषप्रयोग
नांग्यांचा आकार चिमट्यासारखा असून, त्या टोकदार आणि टणक असतात. त्याच्या मागील फुगीर भागात विषग्रंथी असतात. शत्रूला पकडलं की टोकदार नख्यातून त्याच्या शरीरात विष सोडल्याने घायाळ झालेला जीव कासारगोमेचे भक्ष्य बनते. दोन्ही नांग्यांमध्ये सात मायक्रो किलोग्रॅम विष असते.
जैवविविधतेचा विचार केला तर निसर्गातील अन्नसाखळी टिकायला पाहिजे ही काळाची गरज आहे. समुद्रसपाटीपासून उंच टेकडीवर आढळणाºया कासारगोम दुर्मीळ होत आहेत. कासारगोम कीटकांचे प्रमाण कमी करण्याचे काम करते. त्यामुळे तिचे अस्तित्व टिकले पाहिजे. कारण कासारगोम अन्नसाखळीचे एक महत्त्वाचे अंग आहे.
- डॉ. आर. जी. कुदळे, प्राणीशास्र विभागप्रमुख, टी. सी. कॉलेज, बारामती