राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपचा बुरखा कन्हैयाकुमारने फाडला
By admin | Published: March 14, 2016 12:42 AM2016-03-14T00:42:33+5:302016-03-14T00:42:50+5:30
प्रकाशन सोहळ्यातील सूर : ‘काय म्हणाला कन्हैयाकुमार’ पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर : देशद्रोहाच्या गुन्ह्यात अडकविलेल्या कन्हैयाकुमारने जामिनावर सुटल्यानंतर केलेल्या भाषणातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आर.एस.एस.) व भाजप यांच्या धर्मांधतेचा बुरखा फाडून त्यांचा खरा चेहरा उघड केला, असा सूर रविवारी निघाला. निमित्त होते ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी अनुवादित केलेले ‘काय म्हणाला कन्हैयाकुमार’ या पुस्तक प्रकाशनाचे. येथील शाहू स्मारक भवनात श्रमिक प्रतिष्ठानच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे माजी राज्य सचिव सुशील लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मिलिंद यादव अध्यक्षस्थानी होते.
केंद्र शासनाने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी प्रतिनिधी कन्हैयाकुमारवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर देशात ‘देशद्रोही विरुद्ध देशभक्त’ अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान, कारागृहातून जामिनावर सुटल्यानंतर ‘जेएनयू’च्या आवारातील सभेत त्याने भाषण केले. भाषणात संघ, भाजप, मोदी यांच्या कार्यपद्धतीवर त्याने सडकून टीका केली. वास्तवतेवर आधारित त्याने केलेले भाषण देशभर गाजले. ते भाषण सामान्य लोकांपर्यंत जावे यासाठी ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार पाटील यांनी ‘काय म्हणाला कन्हैयाकुमार’ या नावाने अनुवादित पुस्तक लिहिले.
पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात लाड म्हणाले, ‘जेएनयू’वर कम्युनिस्टांचा अनेक वर्षांपासून प्रभाव आहे. येथे वेगळा विचार करणारे विद्यार्थी निर्माण होऊ नये, म्हणून मोदी शासन जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे. संघ, भाजपने नियोजनबद्ध कट करून कन्हैयाकुमारला देशद्रोहाच्या गुन्ह्यात अडकविले आहे. भाजप ‘जेएनयू’लाच बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. कन्हैयाकुमारने मोदी सरकारच्या धर्मांध, भांडवलशाही, विघातक प्रवृत्तीची चिरफाड केली आहे.
यादव म्हणाले, काँग्रेस, भाजप ही दोन्ही सरकारे एकाच प्रवृत्तीची आहेत. सामान्य माणसाला भाकरीची भ्रांत आहे; त्यामुळे सरकारविरोधी धोरणाविरोधात आवाज कमी पडतो आहे. कन्हैयाकुमारने संघ, भाजपच्या कुटील नीतीचा पोलखोल केला आहे.
ज्योती भालकर यांनी स्वागत केले. प्रा. विलास रणसुभे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उमा व मेघा पानसरे, उदय नारकर, आदींसह श्रोत्य
ांची गर्दी होती. चिंतामणी मगदूम यांनी आभार मानले.
'जेएनयू' प्राध्यापकाचे मोबाईलवरुन भाषण
कन्हैयाकुमार यांच्यासोबत काम करणारे प्रा. दिनेश वार्सने यांनी प्रा. रणसुभे यांच्या मोबाईलवर कार्यक्रम सुरू असतानाच संपर्क साधला. मोबाईलच्या स्पीकरवरून प्रा. वार्सने यांनी कन्हैयाकुमारला देशद्रोहाच्या गुन्ह्णात कसे अडकवले आहे, याची माहिती देऊन यामागे संघ, भाजप असल्याचे सांगितले.