राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्तासाठी मदत केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 05:35 PM2019-08-14T17:35:45+5:302019-08-14T17:45:41+5:30
पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या अस्मानी संकटात बाधित झालेल्या लोकांकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीचे ३००० हुन अधिक स्वयंसेवक पूरग्रस्त भागात मदत करत आहेत.
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या अस्मानी संकटात बाधित झालेल्या लोकांकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीचे ३००० हुन अधिक स्वयंसेवक पूरग्रस्त भागात मदत करत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, शिरोळ, करवीर व चंदगड तालुक्यातील स्वयंसेवक मदत करण्यासाठी सरसावले आहेत. या पूरग्रस्तांना अन्न, पाणी, वैद्यकीय सेवा, जनावरांना चारा अशी मदत जागेवर पोहोच करण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीतर्फे जिल्ह्यात ११० केंद्रांवर मदतकार्य सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी अन्य धान्य , वैद्यकीय सेवा , पाण्याचे व्यवस्थापन आणि कपड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच २६ केंद्रावरती मेडिक्लॉरचा वापर करून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. कोल्हापूर शहरातही शुक्रवार पेठ, कसबा बावडा, विनस हॉस्पिटल, नागाळ पार्क, न्यू पॅलेस या भागातील लोकांना बाहेर काढले.
कोल्हापूर शहरात प्रायव्हेट हायस्कुल, खासबाग, दैवज्ञ बोर्डिंग येथे मदत केन्द्र सुरू करण्यात आले आहे. सर्व विविध ठिकाणाहुन आलेली मदत कोल्हापूर येथील या मुख्य केंद्रातून मदत व निवारण केंद्रात येत असून येथूनच त्याचे वितरण करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये नऊ हजारहुन अधिक लोकांची तपासणी करण्यात आली असून गरजे नुसार औषधोपचार करण्यात येत आहे. याशिवाय चौडेस्वरी हॉल येथे निवासस्थानी असलेल्या एनडीआरएफच्या जवानांना भोजन, त्यांची वैद्यकीय तपासणी, औषध उपचार अशी जबाबदारी संघ स्वयंसेवकानी पार पाडली. शहर परिसरात पुरातील पाणी ओसरल्यानंतर संघ स्वयंसेवकांनी उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, शाहूपुरी, सिद्धार्थनगर येथील स्वछता केली.
या कार्यासाठी मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्ती व संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , जनकल्याण समिती या नावे धनादेश किंवा रोख स्वरूपात मदत करत आहेत. यासाठी भगतराम छाबडा, डॉ. सूर्यकिरण वाघ, डॉ. राजेश पवार , केदार प्र. जोशी, राहुल भोसले, अनिरुद्ध कोल्हापुरे, डॉ. मिलिंद सामानगडकर, केशव गोवेकर, मिलिंद कुलकर्णी यासह ३००० स्वयंसेवक या कार्यात सहभागी झाले आहेत.
वैद्यकीय मदत
२६ पूरग्रस्त निवारा केंद्रावर म्हणजेच कोल्हापूर शहर तसेच करवीर, शिरोळ, चंदगड या ठिकाणी वैद्यकीय मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या मध्ये ३२ डॉक्टर आणि २५ मेडिकल प्रतिनिधींचा समूह सेवा देत आहे. सद्यस्थितीला ५ लाख रुपयांहून अधिक मेडिकल साहित्य व औषधे दान स्वरूपात जमा झाली आहेत.
गर्भवती महिलांना मदत
चंदगड येथील स्वयंसेवक तर वीस किलोमीटर जंगलात चालत जात पुरात अडकलेल्या गर्भवती तसेच माता-भगिनींना मदत केली.
इचलकरंजीत २४ तास फिरते रुग्णालय
इचलकरंजी येथील स्वयंसेवकानी आयजीएम रुग्णालयाची स्वच्छता करून तेथे स्वतंत्र वैद्यकीय मदत केंद्र सुरू केले. तेथे २४ तास फिरते रुग्णालय सुरू आहे.