रसिक हा न लिहिणारा लेखक : म्हात्रे

By admin | Published: January 4, 2015 10:29 PM2015-01-04T22:29:12+5:302015-01-05T00:35:55+5:30

ग्रंथ महोत्सव समारोप : सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे अनोखे दर्शन; हजारो सातारकरांची उपस्थिती

Rasik is not the author of the author: Mhatre | रसिक हा न लिहिणारा लेखक : म्हात्रे

रसिक हा न लिहिणारा लेखक : म्हात्रे

Next

सातारा : ‘पुस्तकांचा गंध तुमच्यापर्यंत पोहोचल्यास ग्रंथ महोत्सव समृद्ध होईल, कारण रसिक हा न लिहिणारा लेखक असतो,’असे मत प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी येथे व्यक्त केले. दरम्यान, या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी सातारकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ्यांच्या गजरात त्यांनी साथ दिली.
येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवातील समारोपाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून कवी म्हात्रे बोलत होते. यावेळी वात्रटिकाकार रामदास फुटाणे, पुणे विभागाचे निवडणूक आयुक्त श्याम देशपांडे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, प्रदीप कांबळे, शिरीष चिटणीस, डॉ. राजेंद्र माने आदी उपस्थित होते.
म्हात्रे म्हणाले, ‘इथे काही असा बोर्ड लावला नाही, की हे संमेलन गरिबांचे आहे की शेतकऱ्यांचे. कारण याच्याही पलीकडे जी माणसं काळजातील गुपित अनेक वर्षे आपल्या मनात ठेवतात. ते काळजातील श्रवण पुस्तक रूपाने टाकावं, असं त्यांना वाटतं. तेव्हाच लेखक तयार होतात. आपल्याच मातीतील लोक इतकी मोठी होतात, त्याचा पुरावा देण्यासाठी हे संमेलन आहे. सगळ्या लेखकांचा प्रभाव आमच्यावर आहे, असेही म्हात्रे यांनी सांगितले.
म्हात्रे पुढे म्हणाले, अरुण म्हात्रे ऐरवी कुठेतरी कारकुनी करीत राहिला असता. रामदास फुटाणे कुठेतरी शाळेत टिचर म्हणून काम करत असते. मात्र, या सगळ्यांना कवितेचा स्पर्श झाला आणि ते झळाळून उठले. ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून छोट्या-छोट्या गावांत पुस्तके गेली तरी खूप मोठी क्रांती होईल. तुम्हाला प्रश्न विचारण्याची ताकद हे पुस्तकच देणार आहे. ग्रंथ महोत्सव कशासाठी घ्यावा, हे माझ्याकडे चांगले उत्तर आहे. आजची पिढी खूप बदलली आहे. परवा मी घरी गेलो, त्यावेळी माझा मुलगा हसायला लागला. मी काहीच केले नाही. घरात गेलो, चप्पल काढली. आणि तो हसायला लागला. मी त्याला विचारलं की तू का हसतोयस. तर तो म्हणाला, ‘आजच आम्हाला सरांनी शिकवलंय. संंकटांना हसत सामोरे जायचं.’ अशा पद्धतीने का जर वडिलांना संकट ठरवत असतील तर हा काळ कुठं चालला आहे, असे वाटते. त्यामुळे ग्रंथ महोत्सव हे गरजेचे आहे. ग्रंथ प्रदर्शनामध्ये पुस्तके विकत घ्यावीत. अशा ठिकाणी त्यांनी सर्व माहिती गोळा करावी. मुलांसाठी नवनवीन दालन उपलब्ध करून द्यावी. सरकारच्या गॅझेटमध्येच असे लिहिले आहे की, हा सगळा पगारच अशा प्रकारच्या ग्रंथ प्रदर्शनामध्ये जावं. सगळ्या विद्यार्थ्यांना कला दालन उघडून द्यावी, याच्यासाठी आहे. जेव्हा शिक्षक कमी पडतात. तेव्हा तुमच्यासारखे रसिक पुढे येतात.’
‘मी अभिमाने सगळीकडे सांगतो, की सातारचे जे ग्रंथप्रदर्शन आहे. हे महाराष्ट्रात दुसरीकडे कोठेही होत नाही. साहित्य संमेलन तुमच्याकडे यावं, याच्यापेक्षा त्याचे नेतृत्व सातारच्या मंडळींनी करावं. कारण कसं भरवलं जातं. हे सगळं सातारच्या संमेलनामध्ये मी पाहिलेले आहे. पुस्तकांचं संमेलन कसं असावं, याच्यासारखं उदाहरण सातारच असावं.’
रामदास फुटाणे म्हणाले, ‘ग्रंथ महोत्सवात युवकांना सामील करून घ्यावे. युवकांचा ग्रंथ महोत्सवात सहभाग वाढल्यास नक्कीच परिवर्तन होईल. (प्रतिनिधी)


कवितेसाठी कासचं पठारच पाहिजे
तुमच्याकडे कास पठार आहे. इतकी सुंदर फुले त्यावर येतात. तर तेथे बोलण्यासाठी काही कविताही असतील. कासचे सौंदर्य काही फुलांमध्ये आहे. ही फुलं तुम्हाला आनंद देतात. फुलं सुंदर पठार निर्माण करतात, हे सगळं सांगण्यासाठी सातारचं कास पठारच पाहिजे.
संमेलनाने तुम्हाला काय विचार दिला, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. एक उदाहरण आहे, जर तुम्हाला दोन रुपये मिळाले तर तुम्ही काय कराल, एका रुपयाची भाकरी घ्यायची. आणि दुसऱ्या रुपयाचं फूल घ्यायचं. म्हणजे भाकरी तुम्हाला जगवते आणि फूल तुम्हाला कसं जगायचे ते शिकविते.

Web Title: Rasik is not the author of the author: Mhatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.