रसिकांची ‘अभिरुची’ जपणारी संस्था

By Admin | Published: March 27, 2016 11:40 PM2016-03-27T23:40:15+5:302016-03-28T00:08:55+5:30

राज्यभर फडकविला झेंडा : सशक्त नाट्य चळवळीची प्रदीर्घ परंपरा

Rasikika's 'Aaruchi' Jatantari Institute | रसिकांची ‘अभिरुची’ जपणारी संस्था

रसिकांची ‘अभिरुची’ जपणारी संस्था

googlenewsNext

संदीप आडनाईक -- कोल्हापूर चांगली नाट्यचळवळ रुजविणे, नाट्यरसिकांच्या जाणिवा प्रगल्भ करणे, सशक्त नाट्यकलावंत घडविणे, आशयपूर्ण नाट्यकलाकृती सादर करणे, अशा उद्देशाने ४ जून १९८१ रोजी स्थापन झालेल्या अभिरुची या नाट्यसंस्थेने कोल्हापूरचा झेंडा राज्यभर फडकविला आहे. या संस्थेच्या मांडवाखालून गेलेल्या अनेक कलावंतांनी स्वत:चा ठसा उमटविला आहे. यामध्ये तेजस घाडगे, हिमांशू स्मार्त यासारख्या कलाकारांचा समावेश आहे.
वास्तव जगातील समस्या आणि नातेसंबंंधाचा समाजावर होणारा परिणाम यावर भाष्य करणारी नाटके निवडून तरुण पिढीला नाटकाकडे आकर्षित करण्याच्या हेतूने प्रा. सतीश कुलकर्णी, प्रा. सुधीर जोशी, अवधूत भट, माधवराव पंडित बावडेकर, संजय हळदीकर, प्रसाद जमदग्नी, प्रदीप फाटक, मदन दंडगे, बसुमती धारू यांनी ही अभिरुची संस्था स्थापन केली.
गेल्या ३४ वर्षांत या संस्थेने ७0हून अधिक नाटके, एकांकिका सादर केल्या. सुरुवातीला संस्थेतीलच नाटककार ही नाटके सादर करीत. प्रायव्हेट हायस्कूलचे माजी विद्यार्थी असल्यामुळे शाळेतच तालमींसाठी जागा मिळाली. आज या संस्थेचे कलाकार स. म. लोहिया संस्थेची जागा वापरतात.
ये रे येरे पावसा... या एकांकिकेने अभिरुचीचा नाट्यप्रवास सुरू झाला. सदानंद रेगे यांचे राजा इडिपस हे नाटक सर्वप्रथम राज्य नाट्य स्पर्धेत सादर केले आणि या नाटकाला पहिले बक्षीस मिळाले. २0१५ मध्ये राज्य नाट्य स्पर्धेत बळी या नाटकाला पहिले बक्षीस मिळाले. संस्थेने शांतता कोर्ट चालू आहे, महानिर्वाण, गोची, छळछावणी, १८ वा उंट, स्वगत, विमोचन, हमीदाबाईची कोठी, भूमिकेचा फार्स, यशोधरा ही नाटके, तर भजन, यमूचे रहस्य, होळी, जन्म प्रश्नचिन्हांचा, भिकाऱ्यांचा फार्स, आंब्याचे झाड अशा एकांकिका सादर केल्या. या काळात संस्थेने श्याम मनोहर, सदानंद रेगे, विजय कारेकर, विजया मेहता, गिरीश कर्नाड, सतीश आळेकर, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, तेजस घाडगे, मेघना पेठे, जितेंद्र देशपांडे अशा नामवंतांच्या कलाकृती सादर केल्या आहेत.
प्रारंभी संस्थेने स्वरशिल्प या नावाचा उपक्रम सुरू केला. १९८५ मध्ये बालचित्रपट चळवळ संस्थेने सुरू केली. वर्षभरात १0 बालचित्रपट शाहू स्मारक भवनमध्ये दाखविले. . नाटक, प्रेक्षक, सभासद योजना सुरू केली. याशिवाय ‘राज्य नाट्य स्पर्धा : अपेक्षा आणि भूमिका’ या विषयावर देवल क्लबमध्ये विशेष परिसंवाद घेतला. समर नखाते यांचे प्रकाश योजना शिबिर घेण्यात आले.
प्रा. सतीश कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या या संस्थेची धुरा आता नव्या पिढीच्या हातात आली आहे. जितेंद्र देशपांडे, रवीदर्शन कुलकर्णी, कपिल मुळे, संजय दिवाण यांच्यासह मीना पोतदार, उमा नामजोशी, प्रियंका परुळेकर, उज्ज्वला खांडेकर-शहा हे कलावंत संस्थेसाठी धडपडत आहेत. प्रसाद जमदग्नी अध्यक्ष, महेश गोटखिंडीकर हे सचिव म्हणून, तर भालचंद्र काणे हे खजिनदार म्हणून काम करीत आहेत.



डॉ. वसंतराव देशपांडे स्मृतिसंगीत स्पर्धा नव्या रूपात
अभिरुचीने भारतीय संगीताच्या परंपरेचे जतन करण्यासाठी १९८४ मध्ये डॉ. वसंतराव देशपांडे स्मृतिसंगीत स्पर्धा सुरू केली. शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटासाठी २00५ पर्यंत सातत्याने ही स्पर्धा संस्थेने घेतली. या संगीत स्पर्धेत तत्कालीन बालकलाकार राहुल देशपांडे यांच्यासह आशा खाडीलकर, संजीव अभ्यंकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, पं. जितेंद्र अभिषेकी, प्रभाकर कारेकर, अरुण दाते, मंजूषा कुलकर्णी, मंजिरी असणारे यांनी हजेरी लावली होती. या स्पर्धेत संगीत शिक्षकांचाही कृतज्ञता म्हणून सत्कार करण्यात येत असे. ही स्पर्धा आता पुन्हा नव्याने नव्या स्वरुपात राज्यस्तरावर घेण्यात येणार आहे. संगीताकडे जास्तीत जास्त तरुण पिढीने आकर्षित व्हावे या दृष्टीने यंदा त्याची रचना करण्यात येत आहे.


राज्यस्तरीय नाट्यलेखन स्पर्धा
संस्थेचे माजी अध्यक्ष माधवराव पंडित बावडेकर यांच्या स्मृतिनिमित्त राज्यस्तरीय नाट्यलेखन स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात केवळ नव्या नाट्यसंहिता स्वीकारण्यात येणार आहेत. संस्थेचे कार्यक्षम सभासद अवधूत भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही स्पर्धा यापूर्वी घेण्यात येत असे. नवोदित लेखकांना संधी मिळावी यासाठी हा उपक्रम राबविला जातो. तेव्हा सतीश आळेकर, समर नखाते यासारखे नामवंत परीक्षक म्हणून लाभले होते. यशोधरा, विजय कारेकर यांचे ‘स्वगत’ ही काही नाटके या स्पर्धेतूनच पुढे आली.



मुलांसाठी नाट्य शिबिर
संस्थेमार्फत यंदा इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी नाट्य शिबिर घेण्यात येणार आहे. केवळ नाट्यकलावंतच घडविणे इतकाच या शिबिराचा उद्देश नसून, यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात करियर म्हणूनही उपयोगी होईल, असे प्रशिक्षण यातून मिळेल. यात सभाधीटपणा, आत्मविश्वास निर्माण होईल, याकडे लक्ष दिले जाणार आहे.



‘बळी’च्या प्रयोगाची प्रशंसा
२0१५ मध्ये संस्थेने सादर केलेल्या गिरीश कर्नाड यांनी लिहिलेल्या बळी या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेत पहिल्या क्रमांकासह सहा बक्षिसे मिळविली. खुद्द गिरीश कर्नाड यांनी यासाठी संस्थेची प्रशंसा केली. हे नाटक जितेंद्र देशपांडे यांनी दिग्दर्शित केले होते.


ज्ञान व मनोरंजन यांच्या माध्यमातून नाट्य अभिरुची जाणीवपूर्वक प्रगल्भ करण्यासाठी अभिरुचीने प्रयत्न केले आहेत. नवीन लेखकांना, नवीन कलावंतांना तसेच ग्रामीण भागातील टॅलेंट सर्वांपुढे आणण्यात अभिरुचीला यश मिळालेले आहे. आशय, विषय आणि संहिता या पातळीवर विविधता आणण्यात संस्थेने विविध प्रयोग केले आहेत. यापुढेही ही परंपरा चांगल्या व दर्जेदार कलाकृतीसह कलावंत घडवेल.
- संजय हळदीकर, अभिरुची, कोल्हापूर.



केवळ नाट्यकलाकृती घडविणे, वा तरुण पिढीने नाटकांकडे आकर्षित व्हावे यासाठी नव्हे, तर आत्मविश्वास, वादविवाद, स्पर्धा परीक्षा यासारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अभिरुची जाणीवपूर्वक प्रयत्नशील आहे. ही परंपरा यापुढेही कायम राहील.
- प्रसाद जमदग्नी, अध्यक्ष, अभिरुची नाट्य संस्था

Web Title: Rasikika's 'Aaruchi' Jatantari Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.