वीज कनेक्शन तोडण्याविरोधात रास्ता रोको, पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 08:03 AM2021-03-20T08:03:28+5:302021-03-20T08:04:08+5:30
स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह वीज बिलविरोधी कृती समिती, राज्य इरिगेशन फेडरेशन, माकप, जनता दल, किसान सभा, आप, जनसुराज्य, शिवसेना, राष्ट्रवादी, निवृत्त वीज कर्मचारी संघटना यांनी या चक्काजाम आंदोलनात सहभाग घेतला.
कोल्हापूर : वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरणकडून कनेक्शन तोडले जात असल्याच्या विरोधात कोल्हापुरात शुक्रवारी दुपारी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप वगळता इतर सर्व पक्षीयांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. पंचगंगा पुलावर दर्ग्यासमोर तासभर पुणे- बंगलोर महामार्ग दोन्ही बाजूंकडून रोखून धरल्याने वाहनांच्या २५ किलोमीटरहून अधिक लांब रांगा लागल्या.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह वीज बिलविरोधी कृती समिती, राज्य इरिगेशन फेडरेशन, माकप, जनता दल, किसान सभा, आप, जनसुराज्य, शिवसेना, राष्ट्रवादी, निवृत्त वीज कर्मचारी संघटना यांनी या चक्काजाम आंदोलनात सहभाग घेतला. भरदुपारी पावणे एक ते पावणे दोन असा तासभर उन्हाच्या कडक झळांची पर्वा न करता आंदोेलकांनी महामार्गावरच ठिय्या मारला. आंदोलनात विक्रांत पाटील किणीकर, प्रताप होगाडे, उदय नारकर, संजयबाबा घाटगे, प्रा. जालंदर पाटील, यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
सांगली, उंब्रज येथेही रास्ता रोको
सांगली- इस्लामपूर रस्त्यावर लक्ष्मी फाटा येथेही स्वाभिमानीच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन झाले. उंब्रज येथे महावितरणच्या कार्यालयाबाहेर पाटण- पंढरपूर हा राज्य मार्ग रोखला. विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन अरेरावी करू नये, अशी समज दिली.