इचलकरंजीत पाण्यासाठी ‘रास्ता रोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:24 AM2021-04-15T04:24:05+5:302021-04-15T04:24:05+5:30
इचलकरंजी : येथील नदीवेस नाका परिसरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने तेथील महिला-नागरिकांनी बुधवारी ‘रास्ता रोको’ केला. सुमारे ...
इचलकरंजी : येथील नदीवेस नाका परिसरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने तेथील महिला-नागरिकांनी बुधवारी ‘रास्ता रोको’ केला. सुमारे अर्धा तास सुरू झालेल्या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
आठ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नदीवेस परिसरातील तोडकर मळ्यातील संतप्त नागरिकांनी मुख्य रस्ता अडवून रास्ता रोको केला. त्यामुळे कर्नाटककडे जाणारी-येणारी वाहतूक खोळंबली. दरम्यान, गावभाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने त्यांनी आंदोलकांची समजूत काढली. नगरपालिकेस वार्षिक १८०० रुपये भरूनही अनियमित पाणीपुरवठा का, असा सवाल केला. अर्ध्या तासानंतर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा होणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले. आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बचाटे, सचिन परीट, सुशांत पाटील, सौरभ पाटील आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.