रिंग रोडवरून ‘रास्ता रोको’, पाऊण तास वाहतुकीची कोंडी; नागरिकांचा प्रचंड रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 06:13 PM2019-06-04T18:13:10+5:302019-06-04T18:14:17+5:30
अनेक वेळा आंदोलन करूनही फुलेवाडी - नवीन वाशी नाका - कळंबा रिंग रोडचे डांबरीकरण करण्यात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ संतप्त नागरिक मंगळवारी सकाळी रस्त्यावर उतरले. नागरिकांनी नगरसेवकांची विनंतीही झुगारून कोल्हापूर ते राधानगरी, कोल्हापूर ते गगनबावडा हे दोन्हीही महामार्ग सुमारे पाऊण तास रोखल्याने या मार्गांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली.
कोल्हापूर : अनेक वेळा आंदोलन करूनही फुलेवाडी - नवीन वाशी नाका - कळंबा रिंग रोडचे डांबरीकरण करण्यात प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ संतप्त नागरिक मंगळवारी सकाळी रस्त्यावर उतरले. नागरिकांनी नगरसेवकांची विनंतीही झुगारून कोल्हापूर ते राधानगरी, कोल्हापूर ते गगनबावडा हे दोन्हीही महामार्ग सुमारे पाऊण तास रोखल्याने या मार्गांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली.
यावेळी दोन्हीही आंदोलनस्थळी पोलीस आणि नगरसेवकांची आंदोलकांशी शाब्दिक वादावादी झाल्याने काही काळ वातावरण तंग बनले होते. अखेर रिंग रोडचे पॅचवर्क करण्याचे काम सुरू केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व विजयसिंह देसाई व राजू जाधव यांनी केले.
फुलेवाडीनजीक रास्ता रोको, अधिकाऱ्यांशी आंदोलकांची वादावादी
कोल्हापूर शहराबाहेरून येणारी वाहतूक रिंग रोडमार्गे शहराबाहेर जावी, या उद्देशने रिंग रोडची निर्र्मिती केली; पण रस्त्यात खड्डे पडल्याने रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे संतप्त नागरिक मंगळवारी सकाळी रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावरील फुलेवाडी जकात नाका येथे सुमारे पाऊण तास रास्ता रोको आंदोलन केले.
रिंग रोडवरील वसलेल्या अनेक कॉलन्यांतील नागरिक विजयसिंह देसाई यांच्या नेतृत्वाखाली सकाळी एकत्र आले. त्यांनी महापालिका प्रशासनाविरोधात घोषणा देत कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावरील फुलेवाडी जकात नाक्याजवळ रास्ता रोको आंदोलन केले.
महापालिकेचे अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूूमिका आंदोलकांनी घेतली. अखेर पोलिसांच्या विनंतीनुसार त्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात विजयसिंह देसाई, प्रशांत मोरे, युवराज गोसावी, नीलेश देसाई, तानाजी फाले, लल्लू तोरस्कर, राजू जाधव, संतोष मोरबाळे, विनायक मोरे, बाळ पोवार, बी. एस. पाटील, रंगराव पाटील, युवराज सुतार, अमोल वायदंडे, अक्षय मोरे, बयाजी शेळके, श्रीकाांत गोसावी, मारुती माने, आदींचा सहभाग होता.
शहर अभियंत्यांना पोलीस अधिकारी, आंदोलकांनी धरले धारेवर
आंदोलन संपल्यानंतर सुमारे अर्धा तास उशिरा पोहोचलेले महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्यासह आंदोलकांनी धारेवर धरले. पोलिसांनी २९ वेळा फोन करूनही तो तुम्ही उचलला तर नाहीच; पण तुम्ही उशिरा पोहोचता, ही तुमची भूमिका योग्य नसल्याचे सांगितले.
वाहतुकीची कोंडी
उपनगर तसेच ग्रामीण भागांतून नोकरी अगर इतर कामानिमित्त सकाळी कोल्हापूर शहरात येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे सकाळी आंदोलनावेळी वाहनांची मोठी कोंडी झाली. आंदोलनठिकाण ते फुलेवाडी जुना जकात नाक्यापर्यंत तर पश्चिमेस सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.