‘रॅँचो’ची चटका लावणारी एक्झिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:22 AM2019-05-23T00:22:24+5:302019-05-23T00:22:29+5:30
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई, जोतिबा मंदिर, विमानतळ आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे आणि मतदान यंत्रांच्या स्ट्राँग रूम अशी एक ना ...
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई, जोतिबा मंदिर, विमानतळ आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे आणि मतदान यंत्रांच्या स्ट्राँग रूम अशी एक ना अनेकांची सुरक्षा, अशा एक ना अनेक जबाबदाऱ्या असणाºया कोल्हापूर पोलीस दलाच्या बॉम्बशोधक पथकातील ‘रॅँचो’ या श्वानाचे बुधवारी उपचारादरम्यान शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये निधन झाले. तो १५ दिवसांपासून मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होता.
अभिनेता अमिर खानने ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटात ‘रॅँचो’ या हुशार विद्यार्थ्याची भूमिका रंगविली होती. ती व्यक्तिरेखा चित्रपट रसिकांना खूप भावली. त्याप्रमाणे कोल्हापूर पोलीस दलातील बॉम्बशोधक पथकातही असा हुशार, लॅब्रेडॉर जातीचा रॅँचो नावाचा श्वान होता. तोही सुरक्षा व्यवस्था पाहण्याच्या कर्तव्यावर होता. त्याने कामातही कधीही कसूर केली नाही. रॅँचो गेल्या आठ वर्षांपासून पोलीस दलाच्या बॉम्बशोधक पथकात ‘राखी’ या श्वानाबरोबर काम करीत होता. मात्र, १५ दिवसांपूर्वी त्याची तब्येत बिघडली. तरीही तो मतदान यंत्रे ठेवलेल्या ठिकाणाचीही रोज तपासणी करीत होता. त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखविल्यानंतर मधुमेह झाल्याचे निदान झाले. त्याच्यावर उपचारही सुरू करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती खालावत गेली. बॉम्बशोध पथकात कार्यरत असलेल्या श्वानाचे वारंवार घ्याव्या लागणाºया श्वासामुळे इतर श्वानांच्या तुलनेत फुप्फुस लवकर खराब होते. त्यामुळे त्याची फुप्फुसेही काम करीत नव्हती. गेल्या दोन दिवसांपासून त्याला श्वास घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे त्याची प्रकृती अधिकच खालावली. त्यात बुधवारी सकाळपासून त्याने अन्नपाणी घेणे बंद केले. उपचारादरम्यान सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालयात श्वानपथकाच्या शाखेसमोरील मोकळ्या जागेत त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्याला अखेरची मानवंदना दिली.
८ वा वाढदिवस अधुराच
रॅँचोचा जन्म २५ मे २०११ चा. तो तीन महिन्यांचा असताना त्याला इचलकरंजीहून विकत घेण्यात आले होते. त्याला आणखी तीन दिवसांनी अर्थात २५ मे रोजी सात वर्षे संपून आठवे वर्ष लागणार होते. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेला त्याचा आठवा वाढदिवस अधुराच राहिला.