कोरोना लसीकरणाचा वेग आजपासून वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:23 AM2021-04-19T04:23:04+5:302021-04-19T04:23:04+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यासाठी ३६ हजार लसीचे डोस रविवारी नव्याने उपलब्ध झाल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून रखडलेले लसीकरण आज (सोमवार)पासून पूर्ण ...
कोल्हापूर : जिल्ह्यासाठी ३६ हजार लसीचे डोस रविवारी नव्याने उपलब्ध झाल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून रखडलेले लसीकरण आज (सोमवार)पासून पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहे. जिल्ह्यात रोज सरासरी ८ ते ९ हजार जण लस घेतात. ही लस आणखी चार दिवस पुरणार असल्याने तोपर्यंत आरोग्य विभागाची चिंता मिटली आहे. दरम्यान, रविवारी जिल्ह्यातील २३६ केंद्रांवर पूर्ण क्षमतेने लसीकरण झाले.
कोल्हापुरात लसीकरण उत्सवांतर्गत ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त, सरसकट ४५ वर्षांवरील नागरिक, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, कोविड वॉरियर्स अशा आतापर्यंत ६ लाख ७२ हजार जणांनी लस घेतली आहे. अजूनही लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया व मागणी आहे, पण लसींचा तुटवडा असल्याने जिल्हा प्रशासनाने तयार केलेली केंद्र शनिवारी बंद करावी लागली. २३६पैकी केवळ ५० केंद्रांवरच लसीकरण झाले. जिल्ह्यासाठी अडीच लाख लसींची मागणी नोंदवण्यात आली आहे, पण पुण्यातून किरकोळ स्वरुपातच वितरण होत आहे. रविवारी सकाळी ३६ हजार लसींचे डोस कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर लगेच त्यांचे केंद्रनिहाय वितरणही करण्यात आले.
नागरिकांनी लस घेण्यासाठी कोविन ॲपवर नाेंदणी करुन मगच संबंधित केंद्रावर जावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड उडत असल्याने सोशल डिस्टन्सच्या नियमांचाही फज्जा उडत आहे. रविवारी सुट्टी असतानाही कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयासमोर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.
चाैकट ०१
रविवारी सुट्टीच्या दिवशीही १३ हजार ५७४ जणांनी लसीकरण करुन घेतले. यात पहिला डोस ११ हजार ३८० जणांनी तर २ हजार १९४ जणांनी दुसरा डोस घेतला.